Maval Crime: वडगाव मावळ, ता. 11 : दुचाकीवरून लोणावळ्याकडे निघालेल्या एका महिलेच्या अंगावरील 5 लाख 60 हजार रुपये किमतीचे दागिने (Gold Jewelly Stolen) दोन तोतया पोलिसांनी लंपास केले. कान्हे गावच्या हद्दीत बुधवारी (ता.10) दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Maval Crime)

याप्रकरणी शामल महेंद्र कर्नावट (रा. आदर्श कॉलनी, अहिल्यानगर) यांनी वडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात तोतया पोलिसांच्या विरोधात वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शामल व त्यांचा भाऊ वडगाव मावळ येथून दुचाकीवरून लोणावळ्याला निघाले होते. कान्हे फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला तोंडाला मास्क लावून थांबलेल्या दोन जणांनी त्यांची दुचाकी अडवली. ‘या मार्गावर सकाळपासून सोनसाखळी ओढण्याचे दोन-तीन प्रकार घडले आहेत. अशी माहिती दिली.
त्यामुळे तुम्ही अंगावरचे सोने काढून दाखवा. आम्हाला यादी करायची आहे,’ अशी बतावणी त्यांनी केली. त्यांनी दोन तोळ्यांची सोन्याची माळ, चार तोळे सोन्याच्या बांगड्या काढून एका कागदात गुंडाळून ठेवण्यास फिर्यादींना सांगितले. त्यानंतर हातचलाखी करून दागिने लांबविले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.






