राहुलकुमार अवचट
(Yavat News )यवत : येथे पहाटेपासूनच रामजन्मोत्सव पारंपारिक पद्धतीने अपूर्व उत्साहात व भक्तीभावाने साजरा करण्यात आला. पहाटे विठ्ठल मंदिर येथे प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला. सकाळी दहा वाजता श्री महालक्ष्मी माता मंदिर येथे प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीचे सरपंच समीर दोरगे व डॉ. श्याम कुलकर्णी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
दुपारी १२ वाजता श्री विठ्ठल मंदिर येथे पारंपारिक पद्धतीने श्रीराम जन्म सोहळा साजरा करण्यात आला. रामजन्मोत्सव आरती संपन्न झाल्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. उन्हाळा चालू असल्याने शिवसेनेचे अशोक दोरगे यांच्यावतीने लिंबू सरबत वाटप करण्यात आले. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
मोरया लाईव्ह अँड साउंड मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले…!
तसेच सायंकाळी ६ वाजता श्री महालक्ष्मी मंदिर येथे महिलांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले व यवत पोलीस स्टेशनचे एपीआय मदने, सुजित जगताप यांच्या हस्ते आरती संपन्न होऊन मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या मनमोहक प्रतिमेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. मोरया लाईव्ह अँड साउंड मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले. यावेळी तरुणाई मोठ्या भक्तीभावाने थिरकली. यवत गावातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर लावलेले झेंडे , लाईट्स यांनी सर्व वातावरण भगवेमय झाले होते.
यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. सुमारे तीन तास चाललेली मिरवणूक महालक्ष्मी मंदिर येथे आल्यानंतर सांगता करण्यात आली. रामनवमी उत्सवाचे आयोजन सुरेशभाऊ शेळके मित्र मंडळ, नवरात्र उत्सव मंडळ व समस्त ग्रामस्थ यवत यांच्यावतीने करण्यात आले होते यवत गावात प्रथमच रामनवमी उत्सव एवढ्या मोठ्यात साजरा करण्यात आल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.