यवत, (पुणे) : अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका तरुणाला यवत पोलिसांनी अटक केली आहे. पाटस-कुसेगाव रस्त्यावरील खडकवासला कॅनॉलच्या बाजूला ही कारवाई करण्यात आली आली. आदित्य अंकुश माने (वय-24, रा. पाटस, ता. दौंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 37 हजार 800 रुपये किमतीचे ‘मॅफेड्रोन’ (एम.डी.) हस्तगत करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाटस पोलीस दूरक्षेत्राच्या परिसरात अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, गुरुवारी (ता. 23) मध्यरात्री एका वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र फणसे आणि त्यांच्या पथकाने खडकवासला कॅनॉलच्या बाजूला सापळा रचला. यावेळी एक संशयित तरुण तिथे पिशवी घेऊन उभा असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी संशयित आरोपी याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे असलेल्या पिशवीत 37 हजार 800 रुपये किमतीचे सुमारे 01.89 ग्रॅम वजनाचा ‘मॅफेड्रोन’ (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगलेला आढळून आला. पोलिसांनी सदर माल जप्त केला असून आरोपीला अटक केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र फणसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आदित्य माने याच्या विरोधात यवत पोलीस स्टेशनमध्ये अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई यवत पोलिसांच्या विशेष पथकाने केली असून, या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे हे करत आहेत.







