लोणी काळभोर: थेऊर (ता. हवेली) यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होण्याऐवजी बिनविरोध संचालक मंडळ निवडून आल्यास कारखाना लवकरात लवकर सुरु होऊ शकतो. यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर यांनी सांगितले.
लोणी काळभोर येथील हॉटेल एसफोरजीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी संचालक सुरेश घुले, राजीव घुले, महादेव कांचन, तात्यासाहेब काळे, सुभाष काळभोर, सुभाष जगताप, रोहिदास उंद्रे, राहुल काळभोर, रामदास चौधरी, अर्जुन मदने आदी मान्यवर उपस्थित होते.
माधव काळभोर म्हणाले, कारखाना चालू करण्यासाठी संचालक मंडळ गरजेचे आहे. गेली अनेक वर्षे कारखान्यावर प्रशासक होते. परंतु, त्यांनी कारखाना सुरू करण्यासंदर्भात काहीच हालचाल केली नाही. यापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर तालुक्यातील प्रमुख नेत्यांच्या अनेक बैठका झाल्या. परंतु, सरकार बदलल्यानंतर सर्व काही ठप्प झाले आहे. उद्याच्या मेळाव्यात सर्व इच्छुक उमेदवारांना बोलावले आहे. या मेळाव्यात कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वसंमतीने सकारात्मक निर्णय होईल.
दरम्यान, मंगळवारी (ता. १३) सर्व इच्छुक उमेदवार व तालुक्यातील प्रमुख राजकीय नेते यांचा एक मेळावा कवडीपाट टोलनाका येथील गुलमोहर मंगल कार्यालयात दुपारी ४ वाजता होणार आहे.
३२० उमेदवारी अर्ज दाखल
गेली १३ वर्षे बंद असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक न्यायालयाच्या आदेशानुसार ९ मार्च रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी २७९ इच्छुक उमेदवारांनी ३२० उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या उमेदवारी अर्जांची सोमवारी (ता.१२) छाननी झाली.
निवडणूक बिनविरोध होण्याची गरज
यावेळी सुरेश घुले म्हणाले, तालुक्यात एवढे मोठे नेते असताना यशवंत सहकारी साखर कारखाना गेली १३ वर्षे बंद आहे. ही मोठी नामुष्की आहे. कारखान्याची निवडणूक होण्यासाठी कारखाना अवसायनातून काढून संचालक मंडळाची निवडणूक होणे गरजेचे होते. कारखाना अवसायनातून निघाला असून, न्यायालयाच्या आदेशानुसार आता निवडणूक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची गरज आहे. तसेच रोहिदास उंद्रे यांनी म्हटले की, ‘सर्वसंमतीने ज्येष्ठ नेते जो काही निर्णय घेतील त्यासंदर्भात आम्ही सकारात्मक भूमिका घेऊ’.
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, जिल्हा बँकेचे संचालक माणिक गोते, हवेली पंचायत समितीचे माजी सभापती अशोक मोरे, भाजपचे संदीप भोंडवे, श्रीनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप धुमाळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप गोते, राजाराम कांचन, आप्पासाहेब काळभोर, अनिल टिळेकर, सोपान कांचन, शिवदीप उंद्रे, प्रकाश सावंत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कमलेश काळभोर यांनी केले.