प्रदिप रासकर
निमगाव भोगी : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील व्यंकटेशा पेट्रोल पंपावर काम करणारा कामगार पेट्रोल पंपमधील 82 हजार रुपयांची रक्कम स्वतःच्या बँक खात्यामध्ये टाकून फरार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रभाकर बापूराव गावडे (वय 65 वर्षे रा. टाकळी हाजी, ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी महादेव शिवाजी कोकाटे (रा. गायकवाड वस्ती जळगाव ता. शेवगाव जि. अहमदनगर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकळी हाजी (ता. शिरुर) येथे प्रभाकर गावडे यांच्या मालकीचे व्यंकटेशा पेट्रोल पंप असून येथे महादेव कोकाटे हा कामगार काम करण्यास आहे. कोकाटे याने ग्राहकांकडून ऑनलाइन पद्धतीने आलेले पैसे त्याच्या स्वतःच्या बँक खात्यामध्ये वळवून घेतले. त्यांनतर गोळा झालेली रोख रक्कम मालकाकडे जमा केली. मात्र, ऑनलाईन पद्धतीने घेतेलेले तब्बल 82 हजार रुपये रक्कम त्याच्या जवळ ठेवून घेत मालकाची फसवणूक करुन तो फरार झाला.
याबाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी आरोपी महादेव कोकाटे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उमेश भगत हे करत आहे.