पुणे : पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयात एका फौजदारी प्रकरणात व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलद्वारे साक्ष नोंदवण्यात आली आहे. न्यायाधीश ए.एन. मरे यांच्या कोर्टात आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्याच्या केस सुरु असताना सदर केसमध्ये साक्षीदार असलेल्या वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष नोंदवायची होती.
सदर साक्षीदार हे परळी (जि. बीड) येथे वैद्यकीय व्यवसाय करत असल्यामुळे न्यायालयात साक्ष देण्यासाठी येण्यास अडचण निर्माण होत होती. त्यामुळे न्यायालयाने सदर साक्षीदारास व्हिडीओ कॉन्फरनसिंग द्वारे लिंक पाठवून साक्ष देण्यास सांगितले होते. परंतु, साक्षीदारास कोर्टाशी संपर्क करण्यास तांत्रिक अडचण येत असल्याने आरोपी पक्ष व सरकारी पक्षाच्या संमतीने साक्षीदाराचा जबाब व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉल द्वारे घेण्यात आला. आरोपी तर्फे जेष्ठ वकील सुधीर शाह आणि नितीन भालेराव यांनी कामकाज पाहिले, तर सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील चौरे यांनी कामकाज पाहिले.
दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर न्यायालयीन कामकाजात केल्याने साक्षीदार आणि कोर्टाचा वेळ वाचवता येऊ शकतो. तसेच भविष्यात ही न्यायदान प्रक्रियेमध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग चांगल्याप्रकारे करता येऊ शकतो, अशी माहिती आरोपीचे वकील नितीन भालेराव यांनी दिली.