पुणे : पुणे महापालिकेने मोठा गाजावाजा करून पार्किंग धोरण जाहीर केले होते. या पार्किंग धोरणाच्या अंमलबजावणीला आता सुरुवात झाली असून प्रशासनाकडून महापालिकेच्या ‘ॲमेनिटी स्पेस’वर वाहनतळ विकसित करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू करण्यात आली आहे. हिजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाने भविष्यात प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी या मार्गावरील काही प्रमुख मेट्रो स्थानकांजवळील महापालिकेच्या ‘ॲमेनिटी स्पेस’वर वाहनतळ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून’ सार्वजनिक खाजगी भागीदारी ‘स्वरूपात हिजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रोमार्ग विकसित करण्यात येत आहे.माण -हिजवडी ते शिवाजीनगर या 23 किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी साडेआठ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. नागरिकांनी मेट्रोचा अधिकाधिक वापर करावा यासाठी मेट्रो स्थानकाच्या पाचशे मीटरच्या परिसरात नागरिकांना पार्किंगची सुविधा विकसित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्या दृष्टिकोनातून आता प्रशासनाने पावले उचलली आहेत.
यासाठी महापालिका हद्दीतील आठ तर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील दोन अशा दहा ॲमेनिटी स्पेस’वर वाहनतळ विकसित करण्यात येणार आहे. पुणे महापालिका हद्दीतील 13 हजार 51 चौरस मीटर जागा या वाहनंतळासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. दरम्यान मेट्रोच्या या मार्गावर 23 स्थानके असून, पुणे महापालिका हद्दीत 14 स्थानके आहेत. या आठ’ ॲमेनिटी स्पेस’ बालेवाडी आणि बाणेर परिसरातील आहेत.त्यामुळे या परिसरातील मेट्रो प्रवाशांना पार्किंगची सोयीची जागा उपलब्ध असणार आहे.