प्रतिनिधी: संदीप बोडके
पुणे, ता. 25 : मुळशी येथील मोजणी कार्यालयाच्या कारभारामुळे मौजे लवळे राऊतवाडी येथील शेतकऱ्यावर आपले वडिलोपार्जित घर गमावण्याची वेळ आली आहे. कोर्ट कमिशनर यांनी मोजणी झालेली असतानाच तसेच मोजणी कार्यालयाच्या मूळ रेकार्डकडे दुर्लक्ष करून, लगतधारक शेतकरी व मोजणी कार्यालयाच्या संगनमताने गटाची हद्द चुकीची दाखवल्याचा आरोप लवळे येथील शेतकरी अरुण भिकोबा राऊत यांनी केला आहे.
मौजे लवळे राऊतवाडी (ता.मुळशी) येथे गट नंबर, 413 मध्ये तक्रारदार अरुण राऊत यांची वडिलोपार्जित शेती आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच गटात त्यांचे घर आहे. गट नंबर 413 व गट नंबर 430 या गटाचा बांध हा पुर्व पश्चिम दिशेला सरळ आहे. त्याची नोंद ही शासकीय दफ्तरी नकाशात नमूद आहे. 2006 साली झालेल्या कोर्ट कमिशनर मोजणीतही हद्द व खुणा कायम आहेत. मात्र मोजणी कार्यालय मुळशी हे गट नबंर 413 व गट नंबर 430 चा बांध हा नकाशात सरळ असतानाही तिरकस दाखवत आहे.
मोजणी कार्यालय मुळशीच्या या गलथान कारभारामुळे गट नंबर 413 येथे चाळीस वर्षापासूनचे रहाते घर हे शेजारील गट नंबर 430 मध्ये दाखवत आहे. लगतधारक व मोजणी कार्यालयातील भूकरमापक व अधिकाऱ्याच्या संगनमतामुळे शासकीय दफ्तर व रेकार्ड डावलून चुकीच्या मोजणीच्या हद्दी खुणा दाखवण्याचे काम मोजणी कार्यालय करत असल्याचा आरोप राऊत यांनी पुणे प्राईम न्यूज शी बोलताना केला आहे.
मुळशीतील मोजणी कार्यालयाच्या चुकीच्या कार्यपध्दतीवर शेतकऱ्याने आक्षेप घेत तक्रारी केल्या आहेत. तसेच उपोषणाचा इशारा देऊन उपोषणास सुरुवात केली होती. त्यावेळी मुळशीचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक व मुळशी मोजणी कार्यालयाचे उपअधीक्षक यांनी नव्याने निमताना मोजणी 45 दिवसांत करण्याचे आश्वासन तक्रारदार शेतकऱ्याला देण्यात आल्याने उपोषण थांबवल्याचे राऊत यांनी सांगितले.
शेतकऱ्यांची मागणी नसताना मोजणी अर्ज दुसऱ्या तालुक्यातील मोजणी कार्यालयाकडे वर्ग
प्रस्तुतचे प्रकरण अर्जदार राऊत यांची कोणतीही मागणी नसताना मुळशीतून भोर येथील मोजणी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले आहे. भोर मोजणी कार्यालयाकडून अद्यापही हद्दी खुणा दाखवण्यात आलेल्या नाहीत. केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने हे प्रकरण दुसऱ्या तालुका कार्यालयाकडे वर्ग केले आहे, असे शेतकऱ्याने म्हंटले आहे. कर्मचारी व अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याने भोर मोजणी कार्यालयाकडून न्याय मिळण्याची अपेक्षा राहिली नसल्याचा आरोप शेतकरी अरुण राऊत यांनी केला आहे.
संबधित प्रकरण आमच्या कार्यालयाकडे वर्ग झालेले आहे. मात्र मौजे लवळे राऊतवाडी येथील प्रस्तुतच्या गटावरील अभिलेख मागवले आहेत. ते प्राप्त झाल्यावर हद्दी खुणा दाखवण्यात येतील.
विकास गोफणे, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, भोर
संबंधित शेतक-याने निमताना मोजणीसाठी अर्ज दाखल केलेला होता. तसेच कार्यालयातील काही भूकरमापकांच्या कामाविषयी शंका संबंधित शेतकऱ्याने घेतली आहे. आणि वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार त्यांचे प्रकरण भोर उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडे वर्ग केले आहे.
स्वप्ना पाटील, उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय, मुळशी