उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौकात वारंवार होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी पुढाकार घेतल्याने कोणीतरी सर्वसामान्यांच्या समस्यांची दखल घेतंय, याची चर्चा उरुळी कांचन नागरिकांमध्ये सुरु झाली आहे.
तळवडी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ठोस उपाययोजना म्हणून निरीक्षक पाटील यांनी बॅरिकेट्स पॅटर्न राबवला आहे. त्यामुळे इथल्या बेशिस्त वाहतुकीला आळा बसून या परिसराने मोकळा श्वास घेण्यास सुरुवात केली आहे. शंकर पाटील यांनी केलेल्या योग्य वाहतूक नियोजनामुळे मागील आठ दिवसांपासून तळवडी चौकात होणारी वाहतूक कोंडी दूर झाल्याने पाटील यांनी केलेल्या नियोजनाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
पुणे- सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तळवडी चौक ही अत्यंत जटील अशी वाहतूक कोंडी आहे. आठवड्याच्या शेवटच्या शनिवारी व दर रविवारी असलेला आठवडे बाजार यामुळे उरुळी कांचन हद्दीतील एलाईट चौक व तळवडी चौकात पाठीमागे दोन किलो
मीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत होत्या. लग्नसमारंभ आणि सुट्ट्या यामुळे पुणे- सोलापूर महामार्गावर रविवारी दिवसभर वाहनांची गर्दी होत असते. दुपारपर्यंत पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असते. तसेच सायंकाळी पाचनंतर सोलापूरवरून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची गर्दी वाढते. त्यामुळे पुण्याकडे जाताना उरुळी कांचन हद्दीतील खेडेकर मळा परिसरात वाहनांच्या रांगा लागत होत्या.
दरम्यान, उरुळी कांचनवरून लोणी काळभोरला जाण्यासाठी या वाहतूक कोंडीमुळे अर्धा ते पाऊन तास या वाहतूक कोंडीमुळे लागत होता. रस्ता अरुंद व त्यातच जेजुरी बाजूला जाणाऱ्या व त्या बाजूकडून येणाऱ्या पेट्रोल-डीझेलचे टँकरमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. मात्र, उरुळी कांचन पोलिसांनी तळवाडी चौकच बंद केल्याने वाहतूक सुटसुटीत व कोंडीमुक्त झाली आहे. त्यामुळे विनाअडथळा वाहने निघून जात असल्याने उरुळी कांचन पोलिसांनी केलेल्या या नियोजनाचे सर्वसामान्य नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
याबाबत बोलताना उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील म्हणाले, “शिंदवणे घाटातील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. तळवडी चौक बंद करून वाहनचालकांना डाळिंब रोडकडे जाणाऱ्या ठिकाणावरून फक्त दुचाकी सोडण्यासाठी जागा ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी इरिगेशन कॉलनी व महाडिक पंपापासून युटर्न घेऊन इच्छितस्थळी जावे. यासाठी परिसरातील नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.”
याबाबत बोलताना उरुळी कांचनचे माजी सरपंच संतोष कांचन म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत तळवाडी चौक बंद केल्याने कोणतीही वाहतूक कोंडी होत नाही. मात्र नागरिकांना तातडीने बाहेर जाण्याचे असेल तर एलाईट चौकातील चौक बंद करू नये. एका बाजूने गावकऱ्यांना बाहेर जाण्यासाठी एक मार्ग मोकळा ठेवावा.”
भाजपाचे व्यापार आघाडीचे उपाध्यक्ष विकास जगताप म्हणाले, “उरुळी कांचन ही व्यापारी बाजारपेठ आहे. तळवडी चौक बंद केल्याने व्यापारावर परिणाम होत आहे. व्यापाऱ्यांचे व शाळेतील पालकांसाठी येण्यासाठी व जाण्यासाठी नागरिकांना 15 मिनिट लागतात. त्यामुळे वाहतुकीच्या नावावर उरुळी कांचनची बाजारपेठ, अर्थकारण, यांची नासधूस होत असून बाजारपेठ संपुष्ठात येईल.”
याबाबत बोलताना उरुळी कांचन येथील व्यावसायिक व मेमाणे फार्मचे अध्यक्ष किशोर मेमाणे म्हणाले, “मागील अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरु होता. तळवडी चौकात बॅरिकेट्स लावल्याने 2 टक्के नागरिकांना त्रास होत आहे तर 98 टक्के ट्राफिक सुटले आहे. मागील आठ दिवसांपासून वाहतूक कोंडी दूर झाली असून या ठिकाणी असलेले सेवा रस्ते हे फक्त पार्किंगसाठी राहिले आहेत. त्यावरती पोलिसांनी कारवाई करावी. तळवाडी चौकात लोखंडी बॅरिकेट्स न वापरता कायमस्वरूपी सिमेंटने भरून रस्ता दुभाजक बंद करण्यात यावा.