पुणे : विधानसभा निवडणुकीच्या आचारसहिंता जाहीर होण्यापूर्वीच जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर आराखड्यापैकी सुमारे ५११ कोटी रुपयांच्या कामांची निविदा प्रक्रिया जिल्हा परिषद प्रशासनाने सुरू केली आहे. त्यामध्ये नागरी सुविधा, जनसुविधांच्या कामांसह अंगणवाडी, शाळा खोली दुरुस्ती, तसेच जिल्ह्यातील गावांमधील पायाभूत मूलभूत सुविधांच्या बांधकामांचा समावेश आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळण्याची चिन्हे आहेत. जिल्हा नियोजन समितीने २०२४-२५ या वर्षाचा सुमारे १२५६ कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा मंजूर करण्यात आला होता. त्या कामांमध्ये जिल्हा परिषदेच्या सुमारे ५०० ते ६०० कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे.
आता निवडणुका झाल्यामुळे नव्या सरकारच्या कारकिर्दीत पुणे जिल्ह्यात विकासकामांना गती येण्याची चिन्हे आहेत. पालकमंत्री नियुक्तीनंतर जिल्ह्याच्या विकास आराखड्याबाबत जानेवारी महिन्यात पुन्हा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. त्या वेळी आणखी काही कामांना गती दिली जाण्याची शक्यता आहे.