पुणे : महाराष्ट्रातील पात्र महिलांसाठी सुरू करण्यात आलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही अत्यंत लोकप्रिय ठरत आहे. सध्या या योजनेच्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांच्या हप्त्याबाबत महिलांमध्ये उत्सुकता आणि प्रतीक्षा पाहायला मिळत आहे.ऑक्टोबरअखेरपर्यंत जर सप्टेंबरच्या हप्त्याचा निर्णय झाला नाही, तर सरकार दिवाळीचे औचित्य साधून सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे एकाच वेळी 3000 रुपये मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. परंतु, सप्टेंबर महिना संपून ऑक्टोबरचा पहिला आठवडा उलटला तरीही सप्टेंबरचे पैसे अजून मिळालेले नाहीत. यासंदर्भात शासनाकडून अद्याप अधिकृत जीआर जारी झालेला नाही. दसऱ्याच्या सणानंतर सप्टेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.नोव्हेंबर महिन्यात दिवाळीचा मोठा सण येत आहे.

राज्यभरातील सुमारे 1 कोटी 66 लाख लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीच्या काळात हा निधी खात्यात वर्ग झाल्यास महिलांना सणासाठी मोठा आर्थिक दिलासा मिळेल. आता सरकार याबाबत नेमका काय निर्णय घेते, याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.








