पुणे : दिल्लीतील जंतर मंतरवर गेल्या 36 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे.मात्र या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या तीव्र लाठीमार आणि हिंसक कारवाईनंतर राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेचा तीव्र निषेध करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून थेट सवाल विचारले आहेत.

आपल्या पत्रात राहुल गांधी यांनी प्रशासनाच्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. शांततापूर्ण मार्गाने न्याय मागणाऱ्या तरुणांवर सुरक्षारक्षक व पोलिसांनी अमानुष बळाचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलकांना संरक्षण देणे आणि संवादाद्वारे प्रश्न सोडवणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी असते; परंतु अशा हिंसक पावलांमुळे लोकशाही मूल्यांना तडा गेला आहे, असे त्यांनी नमूद केले. राहुल गांधींनीं अमित शाहांना थेट २ सवाल विचारले आहेत.

1.गृहमंत्री म्हणून आंदोलक विद्यार्थ्यांवर पेलेट गन आणि प्राणघातक बळाचा वापर करण्यास तुम्ही मंजुरी दिली होती का? नसेल तर हे आदेश कोणी दिले?
2. आंदोलकांवर काठ्या चालवणारे साध्या वेशातील लोक नक्की कोण होते—ते पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक? त्यांची नियुक्ती कोणाच्या संमतीने झाली होती?
या कारवाईत अनेक तरुण गंभीर जखमी झाले असून विद्यार्थिनींशी गैरवर्तन झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. हरियाणातील 19 वर्षीय विद्यार्थी साहिल लोचाब याचे उदाहरण देत राहुल यांनी सांगितले की, पेलेट गनच्या दुखापतीमुळे त्याची दृष्टी जाण्याची भीती निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर समोर आलेली छायाचित्रे या हिंसाचाराची गंभीर तीव्रता दर्शवतात, असे सांगत त्यांनी या संपूर्ण प्रकारावर प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागितले आहे.







