हनुमंत चिकणे
लोणी काळभोर (पुणे) : पूर्व हवेलीतील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस कठीण होत चालला आहे. कदमवाकवस्ती (स्टेशन), कुंजीरवाडी व उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील पुणे-सोलापूर महामार्गाच्या बाजूला असलेले सेवा रस्ते कायम गजबजलेले आहेत. रस्त्यावरील खाजगी वाहतुक मोठ्या प्रमाणात कमी झाली असली तरी, वहातुक नियमांना ठेंगा दाखवून धावणारी अवैध प्रवासी वाहने मात्र वरील तीनही चौकात उभी असल्याचे चित्र दिसुन येत आहे.
ही वाहने हटवून रस्त्यात थांबलेल्या रिक्षा व वाहने हटवून वाहतूक कशी सुरळीत होईल हे काम पोलीसांचे आहे. मात्र पोलीस यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याने वाहतूक पोलीसांची नक्की भूमिका काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. सर्वसामान्य नागरिकांचे वाहन रस्त्यात थांबताच त्याला आरेरावी करणारे पोलीस, लोणी स्टेशन, कुंजीरवाडी, उरुळी कांचन येथील एलाईट चौक व तळवाडी चौकात थांबलेल्या वाहनांवर कारवाई का करीत नाही हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या ठिकाणी असलेले चौक चक्क वाहनतळ झाले आहेत.
या चौकातून शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या चौकात भाजीबाजारासह बाजारपेठही आहे. मात्र हा चौकच वाहतूक नियमनात नापास झाल्याने मुख्य रस्त्यावर असलेली वाहनांची पार्किंग, बेशिस्त वाहतूक, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष अशा कारणांनी वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहे. सर्वसामान्य नागरिकांना लहान-लहान बाबींमध्ये देखील नियमाचा बाऊ दाखवून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारणारे वाहतूक पोलीस अवैध प्रवासी वाहतुकीबद्दल एक शब्द ही बोलत नाहीत.
कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, उरुऴी कांचनला जाणाऱ्या प्रवाशांची नेहमीच हडपसरहुन उरुळी कांचन पर्यंत ठिकठिकाणी वर्दळ नेहमीच पहायला मिळते. हडपसरहुन लोणी काळभोरमार्गे उरुळी कांचन, यवत, चौफुला, सोलापूर आदी ठिकाणी जाण्यासाठी तीन चाकी रिक्षांपासून टेम्पो आणि कारमध्ये देखील बिनधास्त बेकायदेशीर प्रवासी वाहतूक सुरू आहे. तरीही पोलीस कारवाई करीत नसल्याची खंत सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. जास्त पैशांच्या हव्यासापोटी तीन चाकी रिक्षासह सहा आसनी रिक्षाचालकही आपल्या वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहनात कोंबतात आणि जास्त फेऱ्या मारण्यासाठी भरधाव वेगाने वाहने पळवतात.
हडपसरहुन उरुळी कांचनसह परिसरात रोज हजार व त्यापेक्षा जास्त अधिक बेकायदा प्रवाशी वहातुक करणारी वाहने धावत असुन, संबधित वाहन चालकाकडे परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) चे फिट प्रमाणपत्र नसणे, वाहन पासिंग, वाहनांचा वीमा न करणे, चालकाकडे वाहन परवाना नसणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवणे, खासगी वाहने प्रवाशी वाहतुकीसाठी वापरणे अशा कित्येक प्रकारे नियमांना धाब्यावर बसवले जात आहे.
पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत ज्या प्रमाणात रिक्षा वाढल्या आहेत त्याच प्रमाणात त्यांचे अनधिकृत थांबे वाढले असल्याचे वास्तविक चित्र दिसून येत आहे. त्यामुळे जेथे रिक्षा थांबेल, तोच आपला थांबा अशी परिस्थिती सध्या या गावांची झाली आहे. त्यामुळे या रिक्षा चौकाचौकात लावल्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडत आहे. आरटीओ, पोलिसांनी याबाबत ठोस पावले उचलल्यास चौकाचौकांत अनधिकृत रिक्षा थांब्याची झालेली विदारक स्थिती आटोक्यात येऊ शकते, अन्यथा तो प्रश्न अधिकच जटील बनणार असल्याचे नागरिक बोलून दाखवित आहेत.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेच्या वतीने जेव्हा वाटेल त्या वेळेस दोन शिपाई स्टेशन चौकात येतात राखण करतात मात्र वाहनेच रस्त्यावर लागत असल्याने वाहनांना जाण्यासाठी रस्ताच उरत नाही. चौकाच्या रस्त्यावर दोन्ही बाजूने अतिक्रमण व वाहने उभी केली जात असल्याने नागरीकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. परिणामी शहरातील मुख्य चौकात जड वाहने, दुचाकी रस्त्यावर येतात. रिक्षा तर कायमच या ठिकाणी चालकाला वाटेल त्या स्थितीत लावलेल्या दिसून येत येतात. मात्र रस्त्यावर वाहने उभी राहू नये, ती वाहतुकीला अडथळा होणार नाही. याची जबाबदारी वाहतूक शाखेचीच असताना हे कर्तव्य पोलीस विसरून काही वेळेस फक्त बघ्याची भूमिका वाहतूक शाखेचे पोलीस घेत असल्याचे नागरिक बोलू लागले आहेत.
दरम्यान, कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील दत्त मंदिराजवळ असणाऱ्या एका नर्सरी व्यावसायिकाने महामार्ग व सेवा रस्त्यावरच दुकान थाटले आहे. हा व्यावसायिक रस्त्यावरच खुलेआम रोपांची विक्री करीत असून नर्सरीतील रोपांची विक्री करण्यासाठी सेवा रस्त्यासाहित महामार्गावरील एका लेनमध्ये गाड्या लावल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच या ठिकाणी महामार्गावरील रस्त्याच्या कडेला कायम मातीचा खच जमा झालेला असून या मातीवरून घसरून आजपर्यंत बरेच दुचाकी चालक जखमी व मृत झालेले आहेत. यामुळे सदर ठिकाणी वाहतूक कोंडी होत असून प्रवासी, वाहन चालक व वाटसरू यांना हकनाक त्रास होत आहे.
महामार्गच नव्हे तर सेवा रस्तेही फुल्ल…!
पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती (लोणी स्टेशन), व उरुळी कांचन येथील एलाईट चौक व तळवाडी चौकात महामार्गाप्रमानेच, सेवा रस्ते हे गर्दीने नेहमी फुल्लच पाहायला मिळतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेली हॉटेल्स, विविध ढाबे, लोकांनी सोयीसाठी अनधिकृतपणे फोडलेले रस्ता दुभाजक, हॉटेलच्या ठिकाणी रस्त्यावर घातलेले गतिरोधक, सेवा रस्त्यावर वाढलेले अतिक्रमण यासारख्या अनेक गोष्टी या रस्ते वाहतुकीसाठी असुरक्षित झालेल्या आहेत. महामार्गावर चारचाकी गाड्या थांबवणे, लेनची शिस्त न पाळणे, यामुळेही अपघातास आमंत्रण मिळत आहे. अशातच जर एखादी दुर्दैवी घटना घडली तरी तात्पुरती मलमपट्टी करायला ही नेतेमंडळी तत्पर आहेत. त्यामुळे प्रशासनाला, नेत्यांना, आधिकाऱयांना व वाहतूक पोलिसांना या गोष्टी दिसत नाही का, असा सवाल येथील नागरिक करत आहेत.
वाहतूक शाखेचे पोलिस असून अडचण नसून खोळंबा…!
लोणी काळभोर येथील एमआयटी संस्थेत जाणाऱ्या चौकात मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. तसेच उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौकातून शाळा, कॉलेज असल्याने विद्यार्थ्यांची देखील मोठी वर्दळ असते. मात्र बेशिस्त रिक्षाचालक रस्त्याच्या कडेला थांबून प्रवासी भरण्यात मग्न असतात. या ठिकाणी वाहतूक शाखेचे पोलिस असून अडचण नसून खोळंबा अशीच अवस्था पाहायला मिळत आहे.