हैदराबाद : तुम्हाला ही अतिशयोक्ती वाटेल, पण हे खरंच झालं आहे. सोन्याचे भाव गगनाला भिडलेले असतानाच एटीएम मशिन्समधून सोन्याच्या नाणी बाहेर येऊ लागल्या तर? हे खरं आहे. हैदराबदमधील एका एटीएममधून चक्क सोन्याची नाणी बाहेर येत आहेत. यासाठी स्वतंत्र एटीएम सुरू करण्यात आले आहेत. आपल्या रोजच्या एटीएममधून सोन्याच्या नाणी येत नसून एका कंपनीने ही योजना राबवली आहे.
०.५, १, २, ५,१९, २०, ५० आणि १०० ग्रॅमची नाणी मिळण्याकरता पर्याय देण्यात आले आहेत. गोल्डसिक्का प्रायव्हेट लिमिटेडने ३ डिसेंबर रोजी हैदराबाद येथील स्टार्टअप कंपनी मेसर्स ओपनक्युब टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या (M/s Opencube Technology Pvt ltd) तांत्रिक सहकार्याने हे गोल्ड एटीएम लॉन्च केले आहे. भारतातील हा पहिला रिअल टाइम गोल्ड एटीएम आहे. (Real Time Gold ATM)
गोल्डसिक्का कंपनीद्वारे (GoldSikka Company Pvt Ltd) सोन्याची नाणी (Gold Coin) देणारे एटीएम लावण्यात आले आहेत. गोल्ड एटीएमद्वारे लोक आपल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डने सोन्याची नाणी घेऊ शकणार आहेत. ०५. ग्रॅमपासून १०० ग्रॅमपर्यंतची नाणीपर्यंतचे आठ पर्याय या एटीएममध्ये उपलब्ध आहेत.
या एटीएम मशीनमध्ये ५ किलो सोने ठेवण्याची क्षमता आहे. हैदराबादमधील गोल्डसिक्का कंपनीच्या मुख्य कार्यालयात म्हणजेच, प्रकाश नगर मेट्रो स्टेशन बेगमपेट येथील अशोक रघुपति चेम्बर्स येथे ही मशीन लावण्यात आली आहे.
एटीएम गोल्डमधून निघालेली ही नाणी तुम्ही सराफाकडे जाऊन विकू शकता आणि त्यातून तुम्हाला हवे असलेले दागिने विकत घेऊ शकता. ही नाणी २४ कॅरेट सोने आणि ९९९ चिन्हांकित आहेत. येत्या काळात देशभरात जवळपास ३ हजार असे एटीएम लावण्यता येणार आहेत. तसंच, ही योजना जागतिक पातळीवर राबवण्याकरताही प्रयत्न सुरू करण्यात येणार आहेत.
गोल्डसिक्काचे उपाध्यक्ष प्रताप म्हणाले, “गोल्डसिक्का लिमिटेड ४ वर्षांपूर्वीच स्थापन झालेली कंपनी आहे. आम्ही बुलिअन ट्रेडिंग करतो. एटीएम मशीनमधून सोन्याच्या नाणी याव्यात अशी संकल्पना आमच्या कंपनीच्या सीईओंना सुचली होती. त्यामुळे आम्ही थोडं संशोधन केलं आणि त्यानंतर ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली,”