Weather Update : राज्यातील हवामानाने मार्च महिन्याच्या अखेरीसही अनिश्चिततेचा पवित्रा कायम ठेवला आहे. एकीकडे काही भागात कडाक्याची उष्णता जाणवत असताना, दुसरीकडे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत असून, काढणीला आलेली पिके अक्षरशः हातातून निसटत आहेत.

भारतीय हवामान विभाग यांच्या ताज्या अंदाजानुसार, नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी, सोलापूर आणि सांगली या 6 जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत, विशेषतः सोमवारपासून पावसाचा जोर आणखी वाढू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे. याचवेळी कोकणात दुपारी 12 ते 4 या वेळेत उष्ण आणि दमट हवामानाचा त्रास वाढण्याची शक्यता आहे.
या परिस्थितीमागे वातावरणातील दाबमानातील बदल, पश्चिमेकडून येणारे आर्द्र वारे आणि तापमानातील चढउतार हे प्रमुख घटक कारणीभूत ठरत आहेत. मात्र या हवामान बदलाचे परिणाम शेतकऱ्यांसाठी गंभीर ठरत आहेत. नाशिक जिल्ह्यातील चांदवड परिसरात 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह सुमारे 1 तास पडलेल्या पावसामुळे गहू, हरभरा आणि साठवून ठेवलेला कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात गारपीटीने थैमान घातले. पापरी गावातील 7 एकरांवरील द्राक्षबाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. शेतकऱ्याने प्रति एकर सुमारे 2 लाख रुपये गुंतवणूक केली होती आणि 50 ते 60 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र गारपीट आणि पावसामुळे द्राक्षांचे घड जमिनीवर पडून संपूर्ण पीक वाया गेले.. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे शेतीचे नियोजन कठीण होत चालले असून, शेतकऱ्यांसाठी हा जगण्याचा प्रश्न बनत आहे. त्यामुळे तात्काळ मदत आणि दीर्घकालीन उपाययोजना ही काळाची गरज ठरत आहे.







