उरुळी कांचन : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (NH 61) पाणी साठल्याने रस्ता दिसत नसल्याने अपघात होत आहेत व अनेकजण जेरबंद होवून पडत आहेत.
या महामार्गावर साईड पट्ट्या राहिल्याच नाहीत तर पाणी वाहून जाणाऱ्या पाईप लाईन बंद झाल्या असून चेंबर दिसत नाहीत, रस्त्याचे साईड पट्ट्यावर बाजूस असलेल्या व्यावसायिकांनी अतिक्रमण करून मुरूम, राडारोडा भरल्यामुळे पाणी रस्त्यावरच साठून राहत आहे. त्यामुळे अनेक वाहने आणि दुचाकी वाहन चालक अपघात ग्रस्त होत आहेत.
पाणी गेल्या वर्षीपासून साचून राहत आहे पण राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. उरुळी कांचन येथील इरीगेशन कॉलनी जवळ हरणा कॉम्प्लेक्स समोर, चौधरी वस्तीजवळील प्रीता टायर दुकानासमोर, उरुळी कांचन पोलीस दूर क्षेत्रा समोर महामार्गावर पाणी साठून राहत आहे. त्यामुळे परिसरात वाहतुकीच्या गैरसोयी बाबत प्रचंड नाराजी पसरली आहे.
या रस्त्यावर वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र ब.कांचन यांनी केली आहे. या ठिकाणची गटरलाईन साफ करुन व चेंबरची तोंडे मोकळी करून पाणी वाहून जाण्याचा मार्ग खुला करावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन यांनी केली आहे.