पुणे : पुण्याच्या जलद वाढीमुळे आणि शहरी विस्तारामुळे अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत.त्यापैकी पुण्यातील पाण्याची कमतरता ही सर्वात गंभीर समस्या आहे. आता पुणेकरांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागला असल्यामुळे नागरिक आक्रमक झाले आहेत. वडगाव शेरी,खराडी,विमाननगर परिसरातील नागरीक पाणी टंचाईमुळे त्रस्त झाले असून त्यांनी रस्त्यावरून उतरून आपला विरोध दर्शवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. तसेच काही ठिकाणी दूषित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा ही होत आहे. अधिकारी पाण्याच्या टाक्या भरण्याऐवजी टँकरने पाणीपुरवठा करायला प्राधान्य देत असल्यामुळे पुणेकरांपुढे पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. प्रभाग क्रमांक तीन मधील धनलक्ष्मी सोसायटी, गणेशनगर,सुनीतानगर, दत्तप्रसाद सोसायटी, जगदंबा सोसायटी तसेच संपूर्ण खराडी,वडगावशेरी परिसरात प्रचंड प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे. या भागात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासन आता तरी जागे होणार का पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
या परिसरातील पाणीटंचाईच्या समस्यावर वडगाव शेरी नागरिक मंचाचे अध्यक्ष आशिष माने यांनीही पाणीपुरवठा विभागाला पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही पाणीटंचाई कृत्रिम असल्याचा आरोप करून पाणीपुरवठा विभागाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पाण्याच्या प्रश्नामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत