Vote rigging: लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘मत चोरी’चा आरोप केल्यानंतर आता एक नवा वाद पेटला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पुण्यातील एका वकील महिलेचा शाई लागलेल्या बोटाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे काँग्रेसच्या त्या आरोपांना आणखी बळ मिळाले आहे की, भाजप देशभरात निवडणुका जिंकण्यासाठी मतांची चोरी करत आहे. याआधी हरियाणाच्या मतदार यादीत एका ब्राझिलियन महिलेचा फोटो आढळल्याने काँग्रेसने तत्सम आरोप केला होता.

काँग्रेसचा आरोप आणि फोटोचा वाद
पुण्यातील वकील उर्मी यांनी गुरुवारी मतदानानंतर आपली स्याही लागलेली बोट दाखवणारी सेल्फी शेअर केला होता त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं होतं – “Voted for Modi-fied India. Jaaike vote daali, Bihar.” या पोस्टनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तिची जुनी मतदानाची छायाचित्रे शोधून काढली आणि दावा केला की ही महिला पुण्यातील मतदार असून ती बिहारमध्ये मतदान केल्याचा दावा करतेय. यामुळे एका राज्यातील मतदार दुसऱ्या राज्यात मतदान करत असल्याचा आरोप पुन्हा पुढे आला.
राहुल गांधी यांनी याआधी हरियाणा निवडणुकीदरम्यानही अशाच प्रकारचा आरोप केला होता, जिथे एका ब्राझिलियन महिलेचा फोटो मतदार यादीत असल्याचं सांगितलं गेलं होतं. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आता पुण्याच्या वकीलीचा फोटो वापरून हा आरोप अधिक जोरात मांडला आहे.
भाजपवर काँग्रेसचे हल्ले
काँग्रेसच्या सोशल मीडिया समन्वयक रेशमा आलम यांनी म्हटलं, “मल्टी-स्टेट व्होटिंग हे भाजपचं नवीन स्टार्टअप आहे, प्रॉडक्ट – बनावट जनादेश.” महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे पाटील यांनी व्यंगात्मक भाषेत लिहिलं, “मी लोकसभेत महाराष्ट्रात मत देईन, विधानसभा निवडणुकीत बिहार मध्ये मत देईन, मोदींसाठी मत चोरून आणीन.” बिहारमधील राजद नेत्या प्रियंका भारती यांनीदेखील टीका करत म्हटलं, “त्या महिलेनं महाराष्ट्रात मत दिलं आणि आता बिहारात देणार आहेत, अशा निर्लज्जपणे त्या मोदींच्या भारताचं समर्थन करत आहेत.”
वकील महिलेचं स्पष्टीकरण
वाद वाढल्यानंतर त्या वकील महिलेने स्वतःच स्पष्टीकरण दिलं. तिने स्पष्ट केलं की तिची पोस्ट केवळ बिहारमधील मतदारांना मतदानासाठी प्रेरित करण्यासाठी होती. तिने कुठेही हे म्हटलं नव्हतं की तिने त्या दिवशी मत दिलं आहे.







