नागपूर : विठ्ठलाच्या प्रासदाच्या लाडवाबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विठ्ठलाच्या प्रासदाचा लाडू आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतो, अशी माहिती अहवालातून समोर आली आहे. ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती’चा वर्ष २०२०-२१ चा लेखापरीक्षण अहवाल सादर झाला. त्यामध्ये हे धक्कादायक सत्य समोर आले आहे. नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून त्यादरम्यान हा अहवाल सादर करण्यात आला.
या अहवालामुळे विठ्ठल मंदिर समितीचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे. पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक नित्यनेमाने जात असतात. विठुरायाच्या दर्शनानंतर प्रसाद म्हणून लाडू मिळतो, भाविक मनोभावे भक्तिभावाने तो ग्रहण करतात. मात्र, प्रसाद म्हणून मिळणारा हा लाडू निकृष्ट दर्जाजा असून तो ज्या कारखान्यात तयार केला जातो, तेथे स्वच्छतेचा अभाव आहे, हे समोर आले आहे. या लाडूच्या सेवनाने भक्तांच्या आरोग्याला अपाय होऊ शकतो, असा इशारा लेखापरीक्षण अहवालात नोंदवला आहे.
काय म्हटलं आहे अहवालात ?
लाडू बनवण्याचे काम बचत गट जेथे करतात ती जागा अस्वच्छ आहे. लाडू सुकण्यासाठी कळकट ताडपत्री वापरली जात असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. 2020-21 मध्ये ज्या संस्थेला प्रसादाचा लाडू बनवण्याचं कंत्राट दिलं होतं. त्या संस्थेने लाडवाच्या पाकिटावर जे घटक नोंदवले. प्रत्यक्ष तपासणी अहवालामध्ये ते आढळून आले नाहीत. लाडू बनवण्यासाठी शेंगदाणा तेल वापरण्याची अट असल्याचे कंत्राटामध्ये नमूद आहे, प्रत्यक्षात सरकीचे तेल वापरले जाते.