पुणे : गणेशोत्सवाचे औचित्य साधून घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते विनायक राऊत यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकारणावर आणि मातोश्रीसमोर झालेल्या आंदोलनावर भाष्य करत त्यांच्या वडिलांच्या अलीकडील भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

राऊत म्हणाले की, न्यायालयाची कायदेशीर नोटीस बजावण्याची एक निश्चित प्रक्रिया असते. ती बाजूला ठेवून वकिलांना सोबत घेऊन थेट संविधानाची प्रत दाखवणे हा निव्वळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रकार आहे. या संपूर्ण घटनेला त्यांनी ‘नौटंकी’ असे संबोधले.दिशा सालियन यांचे वडील कोणाच्या तरी सांगण्यावरून आणि चिथावणीवरून हे कृत्य करत असावेत, असा थेट संशय त्यांनी व्यक्त केला. मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी चाटणारी औलाद असे वडिलांना संबोधत त्यानीं जोरदार टीका केली.
राजकीय स्वार्थापोटी अशी कृती करणाऱ्यांचा धिक्कार करत त्यांनी या प्रकरणामागील अदृश्य हातांचा शोध घेण्याची गरज बोलून दाखवली आहे.तसेच, सध्याच्या राजकारणात सातत्याने घसरत चाललेल्या पातळीवर विनायक राऊत यांनी चिंता व्यक्त केली. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी न्यायालयीन आणि घटनात्मक बाबींचा चुकीच्या पद्धतीने वापर करणे म्हणजे राजकारणातील फालतूपणा असल्याचे ते म्हणाले. राजकीय फायद्यासाठी अशा संवेदनशील विषयांचा वापर करणे पूर्णपणे अयोग्य असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेचा कडक शब्दांत निषेध नोंदवला.

दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकारणावर आणि मातोश्रीसमोर झालेल्या आंदोलनावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. दिशा सालियनच्या निधनाचे आम्हा सर्वांना दुःख आहे. पण तिच्या वडिलांकडून सध्या नौटंकी सुरू आहे. असा जाहीर तमाशा करणे हे त्या मुलीचे दुर्दैव आहे की तिला असा बाप मिळाला, अशी टीका त्यांनी केली.








