पुणे : मांजरी (ता. हवेली) येथील प्रशिक्षण संस्थेतील ग्रामसेवकांसाठी पायाभूत अभ्यासक्रमाला मुंबई येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या शैक्षणिक परिषदेने अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम म्हणून मान्यता दिली आहे. यात १९९४ नंतर अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. आणि या प्रशिक्षण केंद्रात आता तज्ज्ञांकडून मूल्यमापन करण्यात येणार आहे.
मांजरी येथील ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या सहकार्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मान्यता दिली होती. राज्यातील ग्रामीण विकास व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रातील अकरा संस्थांपैकी एक असलेल्या ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेतर्फे पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील उमेदवारांचे प्रशिक्षण घेण्यात येते. संस्थेने गेल्या वर्षी २८ हजार जणांना व्यक्तींना पूर्णवेळ आणि अल्पकालीन अभ्यासक्रमात प्रशिक्षण दिले आहे.
दरम्यान, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने आता ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेबरोबर सहकार्य केल्याने प्रशिक्षणार्थी ग्रामसेवकांच्या शैक्षणिक आणि मूल्यमापनासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील तज्ज्ञ प्राध्यापक असतील. त्यामुळे टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने ग्रामीण विकासासंदर्भात केलेले संशोधन आणि विकसित केलेल्या अध्यापन पद्धतीचा ग्रामसेवक प्रशिक्षणार्थी आणि इतर अधिकाऱ्यांना लाभ होण्यासह प्रशिक्षणाचा दर्जा सुधारून ग्रामीण विकासाला हातभार लागेल.
याबाबत बोलताना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, ग्रामसेवक प्रशिक्षणाच्या अद्ययावत अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणामुळे ग्रामपंचायतींच्या कामात सुधारणा होईल.