लहू चव्हाण
पाचगणी : गावातील प्रत्येक नागरिकाच्या संरक्षणासाठी तसेच रात्री-अपरात्री चोरी, अपघात, आग, लहान मुले हरविणे अशा घटनांचा ताबडतोब छडा लावण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा राबवून, नागरिकांनी आपले व आपल्या कुटुंबाचे तसेच परिसरातील नागरिकांचे संरक्षण करावे, असे आवाहन ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे यांनी भोसे येथे केले. या वेळी ग्रामस्थांना या यंत्रणेची माहिती प्रात्यक्षिकांद्वारे दाखविण्यात आली.
या वेळी पाचगणी पोलीस ठाण्याअंतर्गत अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. या यंत्रणेच्या माध्यमातून आपल्या पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना गंभीर अपघात, वन्य प्राण्यांचा हल्ला, रात्रीची चोरी आदी संकटापासून या यंत्रणेत सामील होऊन एकमेकांना डिजिटल मोबाईलच्या माध्यमातून टोल फ्री क्रमांकावर संपर्क केला तर आपली व आपल्या कुटुंबाची त्याचबरोबर गावाचीही सुरक्षा आपण प्रभावीपणे करू शकतो, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांक १८००२७०३६००/९८२२११२२८१ वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जाणार असल्याने, गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे यांनी नागरिकांना यंत्रणेचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दाखवले. पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी यंत्रणेत पुढील ४८ तासांत सहभागी होण्याचे आवाहन केले.
ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून चोरी, दरोड्याच्या घटनेत चोर तत्काळ जेरबंद होण्यास मदत होणार आहे. पाचगणी पोलीस स्टेशन हद्दीतील प्रत्येक गावात ही यंत्रणा प्रभावीपणे राबवल्यास मोठा फायदा व मदत होणार आहे. त्यामुळे सर्वांनी ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करावी, असे आवाहन या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी केले.
या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने, शिवाजी ननवरे, ग्राम सुरक्षा यंत्रणेचे वरिष्ठ विभागीय अधिकारी गणेश लोकरे, ग्राम सुरक्षा यंत्रणा संपर्क अधिकारी सतिश शिंदे, पांचगणीचे मंडल अधिकारी चंद्रकांत पारवे, बाजार समिती संचालक राजेंद्र भिलारे, गुलाब गोळे, भाजपचे महाबळेश्वर तालुकाध्यक्ष अनिल भिलारे, रमेश चोरमले, गोपनीय अंमलदार विजय चव्हाण, पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष अजय राजपुरे यांच्यासह पाचगणी पोलीस स्टेशनचे अंमलदार व हद्दीतील सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष,पत्रकार बांधव, अशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. गुलाब गोळे व पोलीस पाटील सुप्रिया आंब्राळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संयोजन पांचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी केले.
नागरिकांना भावनिक आवाहन
मंडल अधिकारी चंद्रकांत पारवे यांनी, आपल्या निवासस्थानी कराड येथे चोरी करण्यासाठी तलवारी घेवून घरात घुसलेल्या चोरांच्या अनुभवाची माहिती सांगितली. ही यंत्रणा त्यावेळी असती तर माझ्या घरी चोरी झाली नसती. त्यामुळे सर्वांनी या उपक्रमात सहभाग नोंदवा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.