मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आहे. मुंबईत महाविकास आघाडीने वर्चस्व मिळवले आहे. दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई विजयी झाले. मुंबई उत्तर पश्चिममध्ये अमोल किर्तीकर यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. तसेच काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी भाजप उमेदवार उज्ज्वल निकम यांचा पराभव केला आहे.
सुरुवातीला उज्ज्वल निकम यांची मोठी आघाडी
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरु झाल्यानंतर सुरुवातीला उज्ज्वल निकम यांनी मोठी आघाडी घेतली होती. यावेळी वर्षा गायकवाड पिछाडीवर होत्या. मात्र, मतमोजणीच्या अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये वर्षा गायकवाड यांनी मोठी आघाडी घेत विजय मिळवला आहे.
मुंबईत महाविकास आघाडीला सहा पैकी पाच जागा
मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांपैकी पाच जागांवर महाविकास आघाडीने यश मिळवले आहे. दक्षिण मुंबईत अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई, ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील, मुंबई उत्तर पश्चिममध्ये अमोल किर्तीकर आणि मुंबई उत्तर मध्य मध्ये वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवला आहे.
उद्धव ठाकरेंचे शब्द खरे ठरले
वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळल्यानंतर शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी वर्षा गायकवाड यांना खासदार करुन दिल्लीला पाठवणार असे म्हटले होते. उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी पहिल्यांदा पंजाला मतदान करणार असल्याचे देखील म्हटले होते. वर्षाताईंना खासदार करुन दिल्लीला पाठवणार आहे. देशात हुकूमशाही येऊ नये, राज्यघटना बदलू नये यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी लढतेय आणि जिंकणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.