पुणे : महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित फुले चित्रपट 11 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. पण चित्रपट रिलीज होण्याआधीच वादात सापडल्याने या चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. यावरून आता पुण्यात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असून प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात फुलेवाड्याबाहेर निषेध आंदोलन करण्यात आलं आहे.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित फुले चित्रपटातील काही दृश्यांना ब्राह्मण महासंघांकडून विरोध दर्शवण्यात आला आहे.या विरोधामुळे आज( 11 एप्रिल रोजी )प्रदर्शित होणाऱ्या फुले चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.तसेच सेन्सार बोर्डाकडून या चित्रपटातील अनेक दृश्यांना कात्री लावण्यात आली आहे. या सर्व प्रकरणाचा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी निषेध केला आहे. आज सेन्सार बोर्डाच्या निर्णयाविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून फुलेवाड्याच्या बाहेर आंदोलन करण्यात आल असून या आंदोलनात सेन्सार बोर्डाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला आहे . तसेच बोर्डाने फुले चित्रपटातील कोणतेही दृश्य कट करू नये अशी मागणी देखील करण्यात आली. तसेच सेन्सार बोर्डाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला .काही लोकांच्या म्हणण्यामुळे फुले या चित्रपटाची तारीख पुढे ढकल्याचा आरोपही यावेळी वंचित बहुजन आघाडीने केला.
दरम्यान वंचित बहुजन आघाडी फुले- शाहू- आंबेडकर विचारधारेला अनुसरून महात्मा फुलेंच्या अपमानावर गप्प बसणार नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.