हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन शहरातून जाणार्या पुणे – सोलापूर महामार्गाच्या पथकर मार्गावर तसेच उरुळी गावातील मुख्य बाजारपेठ असलेल्या महात्मा गांधी व आश्रम रोडच्या दोन्ही बाजूला पथार्या मांडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आश्रम रोड ते तळवाडी चौक या मुख्य रस्त्यावर वाहनांची अनधिकृत पार्किंग दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
उरुळी कांचन येथील वर्दळीचे मुख्य रस्ते हे चक्क वाहनतळ झाल्याचे चित्र सध्या उरुळी कांचन शहरात दिसून येत आहे. त्यामुळे या मार्गावरून चालत जाणाऱ्या व्यक्तीला या वाहतूक कोंडीचा तोटा सहन करावा लागत आहे.
पुणे – सोलापूर महामार्गाच्या कडेला व्यावसायिक दुकाने असलेल्या इमारती उभारली आहेत. त्या इमारतीत वाहने उभी करण्यासाठी वाहनतळ केलेले नाही. त्यामुळे इमारतीत जाणार्या लोकांच्या दुचाकी, चारचाकी, वाहने चक्क रस्त्यावर उभ्या केल्या जात आहे. त्यामुळे रस्ता अरुंद होतो व वाहतुकीस अडथळा येत आहे. तसेच कोट्यवधी रुपये खर्च करून पथकर नावाला असून त्यावरती टपरीवाले, भाजीविक्रेते, आदि विक्रेत्यांनी अतिक्रमणे केली आहेत.
उरूळी कांचन मधील मुख्य अंतर्गत रस्त्यावर वाढत असलेल्या अतिक्रमणामुळे या रस्त्याची रुंदी कमी झालेले आहे. त्यातच या मार्गावर अस्ताव्यस्त पद्धतीने उभे करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे देखील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो. उरुळी कांचन मधील बहुतेक शाळा सरकारी कार्यालय, धार्मिक स्थळे, बँका, निसर्ग उपचार, आश्रम, पतपेढ्या, यांच्याकडे पार्किंग व्यवस्था उपलब्ध नसल्याने वाहनांची रस्त्यावर पार्किंग केली जाते. या गोष्टीकडे ग्रामपंचायत व पोलिस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यासाठी ग्रामपंचायतीने रस्त्यावरील अतिक्रमण हटवणे गरजेचे आहे.
दरम्यान, तळवडी चौकातील वाहतूक व्यवस्था तसेच सेवा रस्त्यावर उभे असणारे खाजगी वाहतूक करणारी वाहने यामुळे जेजूरीकडून सोलापूरसह – पुण्याकडे जाणार्या येणार्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या चौकात वाहतूककोंडी नित्याची झालेली आहे. या सर्व गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देऊन ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाने योग्य कारवाई करणे गरजेचे आहे. परिसरात वाहने लावण्यासाठी स्वतंत्र वाहनतळ नाही. त्यामुळे वाहने लावण्यचा प्रश्न निर्माण झाला आहे. बहुतांश वाहने रस्त्यावरच लावली जातात.
याबाबत उरुळी कांचन पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे म्हणाले, ” उरुळी कांचन ग्रामपंचायतची बाजारपेठ हि मोठी असून या गावात जाण्यासाठी मुख्य दोनच रस्ते आहेत. यावेळी या बाजापेठेत येणाऱ्या व जाणऱ्या व्यापाऱ्यांची, नागरीकांची मोठी वर्दळ आहे. त्यामुळे या व्यापाऱ्यांनी व दुकानदारांनी आपआपल्या दुकानापुढे गाड्या लागणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच उरुळी कांचन ग्रामपंचायतीला मदत लागल्यास कायम तत्पर आहोत.”
याबाबत उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र कांचन म्हणाले, “व्यापारी भाजीवाले, हातगाड्या असणाऱ्या तसेच पार्किंग होत असलेल्या ठिकाणी ग्रामपंचायतीतर्फे ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून अतिक्रमणाबाबत माहिती दिली जाते. गणपती उत्साहाच्या काळात अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात ग्रामपंचायतीकडून कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ज्या व्यापाऱ्यांची दुकाने आहेत त्यांनी पार्किंगची सुविधा करावी. काहीजण अनाठायी तासनतास गाड्या लावून निवांतपणे फिरतात अशा निवांत गाडी लावून फिरणाऱ्यांवर यापुढे कारवाई करण्यात येणार आहे.”