उरुळी कांचन, (पुणे) : गेल्या दोन अडीच वर्षांपासून होणार होणार अशी चर्चा असलेल्या स्वतंत्र उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे उद्घाटन पुन्हा एकदा लांबले आहे. राज्याच्या मंत्रीमंडळातील “पॉवर” बाज मंत्री महोदयांना पोलिस ठाण्याच्या उद्घाटनासाठी वेळ मिळत नसल्याच्या कारणामुळे पोलीस ठाण्याचे उद्घाटन पुन्हा एकदा लांबल्याची चर्चा उरुळी कांचन परीसर व खुद्द पोलिस दलात सुरु झाली आहे. तसेच स्वतंत्र उरुळी कांचन पोलीस चौकीचा ताबा आता ग्रामीण पोलिसांकडे गेल्याने लोणी काळभोर पोलिसांना उघड्यावरच काम करावे लागत आहे.
राज्य सरकारने हवेली तालुक्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवीन उरुळी कांचन पोलीस ठाणे निर्माण करण्यास डिसेंबर २०२१ मध्ये मान्यता दिली असून, हे पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस दलामध्ये राहणार आहे. या संदर्भातील आदेश १३ डिसेंबर २०२१ रोजी गृह विभागाचे तत्कालीन सहसचिव कैलास गायकवाड यांनी काढला होता. उरुळी कांचन स्वतंत्र पोलीस ठाणे तयार करण्यासाठी ६ कोटी ४८ लाख २७ हजार ३०० रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या पोलीस ठाण्यात एकूण १०० पदे भरली जाणार आहेत. या पोलिस ठाण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे उरुळी कांचन पोलिस चौकीचे रुपांतर पोलिस ठाण्यात होणार असल्याने, या ठिकाणच्या इमारतीला रंगरगोटीही करण्यात आली आहे. तर उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व अपघातग्रस्त वाहने तसेच त्या ठिकाणी असलेले भंगार साहित्य हटविण्यात आले आहे. मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. नियोजनाच्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर कामे झाली आहेत. मात्र, पोलीस ठाण्याच्या उद्घाटनाचा मुहूर्त कधी निघणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उरूळी कांचन पोलीस ठाणे निर्माण करण्याची अधिसूचना शासनाने काढली आहे. परंतु, उरुळी कांचन पोलीस ठाण्यासाठी जिल्हा ग्रामीण पोलीस दलाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने गेले दोन वर्षे ते सुरू होऊ शकले नाही. तसेच उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या पहिल्या पोलीस निरीक्षकपदी भोर पोलीस ठाण्यातील शंकर मनोहर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. पण पोलीस ठाणे कधी सुरू होणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.
दरम्यान उरुळी कांचन व परिसर औद्योगिकदृष्ट्या विकसित होत आहे. शैक्षणिक, अभियांत्रिकी, वैद्यकीयसह स्पर्धा परीक्षा केंद्रामुळे तालुका, बाहेरील विद्यार्थ्यांचा ओढा आहे. स्थानिक, परप्रांतिय मजूरही येत असल्याने व वाढत्या उपनगरांमुळे कायदा सुव्यवस्था राखताना पोलीसांना ताण सहन करावा लागतोय. कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी नव्या स्वतंत्र पोलीस ठाण्याची नितांत गरज आहे.
लोणी काळभोर पोलिसांचा कारभार उघड्यावर
हवेली तालुक्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवीन उरुळी कांचन पोलीस ठाणे निर्माण करण्यास डिसेंबर २०२१ मध्ये मान्यता दिली असून, हे पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस दलामध्ये राहणार आहे. त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी कागदोपत्री उरुळी कांचन पोलीस चौकीचा ताबा घेतला आहे. ग्रामीण पोलिसांनी सध्या इमारतीला कुलूप लावल्याने आणि स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरु न झाल्याने लोणी काळभोर पोलिसांना उघड्यावरच दैनंदिन कामकाज करावे लागत आहे. मात्र, ग्रामीण आणि शहर पोलीस यांच्या कागदोपत्री घोड्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कधी एकदाचे उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे उद्घाटन होते आणि हा प्रकार थांबतो, असा खडा सवाल येथील नागिरक उपस्थित करत आहेत.