उरुळी कांचन, (पुणे) : प्रस्तावित पुरंदर विमानतळ उन्नत मार्गातून मेट्रो सेवा विस्तारणे, रिंग रोडची कनेक्टिव्हिटी, रेल्वे हब या सर्वांचा मेळ घालून उरुळी कांचन परिसर भविष्यात ‘लॉजिस्टिक पार्क’ म्हणून विकसित करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. त्यादृष्टीने लवकरच या परिसराच्या विकासाचा एक मास्टर प्लॅन आणि रोडमॅप तयार केला जाईल, असा विश्वास शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी व्यक्त केला.

श्री क्षेत्र डाळिंब बन (ता. दौंड) येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त आयोजित महापूजा आमदार माऊली कटके यांच्या हस्ते उत्साहात पार पडली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या महापूजेवेळी राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे, माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे, हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे, दौंडचे सभापती सुखदेव चोरमले, गटविकास अधिकारी अरुण मरभळ, श्री विठ्ठल देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र कांचन, दौंड पंचायत समिती सदस्या राजश्री म्हस्के, रामदास चौधरी, भाऊसाहेब कांचन, डाळिंबचे सरपंच बजरंग म्हस्के यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते.
यापुढे बोलताना आमदार कटके म्हणाले, “प्रतिपंढरपूर म्हणून डाळिंब बन येथील श्री विठ्ठलाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, त्यांचा भक्तीचा ओढा या ठिकाणी पूर्ण होतो. अशा सांप्रदायिक सेवेतूनच समाजात एक सुसंस्कृत आणि ध्येयनिष्ठ पिढी घडत आहे. उरुळी कांचन येथून थेट पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रो मार्ग जोडण्याचा मानस आहे. रिंग रोड आणि रेल्वे हबमुळे हा भाग भविष्यात राज्याचे एक प्रमुख व्यापारी व दळणवळण केंद्र बनेल.
दरम्यान, कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री विठ्ठल देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र कांचन म्हणाले, “राज्य सरकारकडून श्री क्षेत्र डाळिंब बन देवस्थानला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. यामुळे भाविकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा आणि विकासकामांना मोठा निधी उपलब्ध होत आहे. भाविकांच्या सोयीसाठी तब्बल 5 कोटी रुपये निधी मंजूर झाला असून, भव्य भक्तीनिवासाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवस्थानचे विश्वस्त एल. बी. म्हस्के यांनी केले, तर आभार सागर म्हस्के यांनी मानले.







