उरुळी कांचन: सोशल मीडियावर धारधार तलवारीचे स्टेट्स टाकून दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाला उरुळी कांचन ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी (ता. १३) दुपारी ही कारवाई केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली.
विलास उर्फ विकास सर्जेराव घोरपडे (वय २१, रा बोरीभडक, ता.दौंड, सध्या ओंकार फॅब्रिकेशन उरुळी कांचन, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून धारधार तलवार जप्त केली आहे. शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओंकार फॅब्रिकेशन या ठिकाणी एकजण धारधार तलवार हातात घेऊन दहशत निर्माण करून त्याचे रिल्स सोशल मीडियावर टाकल्याची माहिती उरुळी कांचन पोलिसांना एका खबऱ्याकडून मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार फॅब्रिकेशन या ठिकाणी पोलिसांनी जाऊन माहिती घेतली असता त्या ठिकाणी विलास उर्फ विकास घोरपडे दिसून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने रिल्स टाकल्याची माहिती पोलिसांना दिली.
दरम्यान, त्याच्याकडून पोलिसांनी धारदार तलवार ताब्यात घेऊन त्याच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे, पोलीस हवालदार रणजीत निकम, पोलीस हवालदार सचिन जगताप, पोलीस शिपाई दीपक यादव यांनी केली आहे.