उरुळी कांचन (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत पुण्याकडे निघालेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका ६८ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (ता. ३०) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एच. पी. पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला आहे.
संभाजी बबन तुपे (वय ६८, रा. तुपेवस्ती, उरूळी कांचन, ता. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी अविनाश संभाजी तुपे (वय ४५, रा. सदर) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत उरुळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजी तुपे हे मंगळवारी (ता. ३०) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन परिसरातून पुण्याच्या बाजुकडे दुचाकीवर निघाले होते. या वेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने तुपे याच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला, तोंडाला जबर दुखापत झाली.
दरम्यान, या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले. अपघाताची खबर न देता अज्ञात वाहनचालक निघून गेला आहे. या प्रकरणी अविनाश तुपे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार निकम करीत आहेत.