सुरेश घाडगे
परंडा : परंडा तालुक्यातील बोडखा शिवारात वीज कोसळून एका बैलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज रविवारी (ता.१६) दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामुळे शेतकरी दत्तात्रय मारूती लटके यांचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी दत्तात्रय लटके हे बैलांना घेऊन बोडखा शिवारात गेले होते. तेव्हा बैल शिवारातील शेतात चारा खात असताना, वादळी वीजांच्या कडकडाटात पावसाला सुरवात झाली. तेवढ्यात एका बैलाच्या अंगावर वीज कोसळली. आणि बैलाचा यामध्ये मृत्यू झाला.
दरम्यान, शेतकरी लटके यांचा बैल दगावल्याने त्यांचे तब्बल ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसान भरपाई त्वरित द्यावी. अशी मागणी लटके यांनी केली आहे.