लोणी काळभोर, (पुणे) : पुणे येथील अल्पवयीन तरुणाने मद्याच्या धुंदीत भरधाव चारचाकी चालवत तरुण, तरुणींना उडविले. यात दोघांचा हकनाक बळी गेल्याने या हायप्रोफाईल घटनेची राज्यात चर्चा सुरू आहे. शहरात एवढी मोठी दुर्घटना घडली असताना लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरात अल्पवयीन वाहनचालक वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवून सुसाट वेगाने वाहने पळवीत आहेत.
लोणी काळभोर व उरुळी कांचन वाहतूक पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करावी. तसेच अल्पवयीन व वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या तरुण, तरुणींच्या ताब्यात पालकांनी सर्रास दुचाकी दिल्या आहेत. किमान आता तरी, पुणे येथील दुर्घटनेचा धडा घेऊन शहर वाहतूक शाखेने कडक पावले उचलावीत तरच अशा घटनांना चाप बसेल, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
पुणे – सोलापूर महामार्गावर भरधाव वेगाने दुचाकी, चारचाकी वाहन चालविण्याची जणू काही स्पर्धाच सुरू आहे. मात्र, ज्यांच्याकडे वाहन चालविण्याचा किंवा साधा शिकण्याचा परवाना नाही, अशा मुलांमध्ये वाहन चालविण्यासाठी चांगलीच स्पर्धा सुरू असल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे. अल्पवयीन वाहनचालकांकडून अपघाताचे प्रकार अनेकदा घडले आहेत, त्यांच्यामुळे इतर नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होतो. परंतु, वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात कोणतेही सकारात्मक पावले उचलली नसल्यामुळे अद्यापही या प्रकारात काही फरक पडला नसल्याचे दिसत आहे.
मुख्य रस्त्यावर तसेच बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाण, शाळा, महाविद्यालय परिसर यासह आदी ठिकाणी नेहमीच अल्पवयीन मुले घरातून दुचाकी, चारचाकी घेऊन सर्रासपणे दिवसरात्र बाहेर पडतात. वाहन चालविताना हॉर्नचा कर्कश आवाज करत, वाहनांची फायरिंग वाढवत प्रदूषण वाढवितात. यामुळे रस्त्यावरील पादचारी, व्यावसायिक यांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
शहर वाहतूक व ग्रामीण वाहतूक शाखेतील पोलिसांचे व उपप्रादेशिक परिवहन विभागाचे (RTO) याकडे दुर्लक्ष करत आहे. मात्र, भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी पालकांनी सजग राहणे गरजेचे आहे. तोकड्या मनुष्यबळाचे कारण देऊन शहर वाहतूक शाखेतील अधिकारी व कर्मचारी कारवाईसाठी असमर्थता दर्शवितात. त्यामुळे तरुण, तरुणींचे फावले आहे. एखादी दुर्घटना घडली तरच प्रशासन सक्रिय होऊन कारवाई करणार का? असा प्रश्न सामान्य नागरिक करीत आहेत.
दरम्यान, वाहन चालविताना कट मारणे, अचानक ब्रेक मारणे, रस्त्यावर अनेकवेळा दुचाकी, चारचाकी वाहन उभा करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, तसेच अशा वेळेस वाहनाचा धक्का लागला की, वादविवाद, भांडणतंटा होणे हे नित्याचे झाले आहे. याबरोबरच छोटे-मोठे अपघात घडत आहेत. कारवाई होत नसल्याने व पालकही गांर्भीयाने घेत नसल्याने मुलांचे हिम्मत वाढत आहे. कालांतराने मिसरूड न फुटलेली १४ ते १८ वयोगटातील मुले सर्रासपणे दुचाकी वापरताना शहरात जागोजागी दिसून येत आहेत. तर वाहतूक पोलीस कारवाई करीत नसल्याचे आढळून आले आहे.
वाहनांवर हुल्लडबाजी
मुलाचे अठरा वर्षे पूर्ण नाही. त्याला व्यवस्थित वाहन चालविता येत नाही, वाहन चालविण्याचा परवानाही नाही हे माहित असतानाही अनेकदा पालक आपल्या मुलाच्या हातात वाहनांची चावी लाडाने सोपवितात. आपला मुलगा वाहन चालवितो, याचे त्यांना कौतुक वाटते. मात्र, मुलगा वाहन घेऊन पालकांच्या नजरेआड गेल्यानंतर सुसाट सुटतो. अनेकदा मित्रांना ट्रिपल सीट बसवून हुल्लडबाजी केली जाते. यातून अपघाताचा धोकाही निर्माण होतो.
याबाबत बोलताना लोणी काळभोर येथील वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कुमार घाडगे म्हणाले, “पालकांमध्ये यासंदर्भात जनजागृती नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांकडेसुद्धा दुचाकी पहावयास मिळते. लोणी काळभोर परिसरात ४ ते ५ अल्पवयीन मुलांवर कारवाई करून प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. जोपर्यत पालक स्वतः गाडी घेऊन जाण्यासाठी येत नाहीत, तोपर्यंत गाडी देण्यात आलेली नाही. यापुढेही परिसरात कारवाई सुरूच राहणार आहे. वाहनचालकांनी सर्व नियमांचे पालन करून आपली वाहने चालवावीत.”