Ujani News मोहोळ : पाटकुल येथील उजनीचा डावा कालवा फुटून सहा महिने लोटले तरी अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. तरी शेतकऱ्यांच्या पिकांची झालेली नुकसान भरपाई त्वरित देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी जलसंपदाचे कार्यकारी संचालक व सहाय्यक मुख्य अभियंता यांच्याकडे केली. (Ujani News)
पुणे येथील सिंचन भवनला जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक कोपोले व सहाय्यक मुख्य अभियंता वि.प्र.मा. मकरंद मयाकल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रभाकर देशमुख यांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील मौजे पाटकुल येथील 29 जानेवारीला उजनीचा डावा कालवा फुटून कष्टकरी शेतकऱ्यांच्या पिकांचे व फळबागांचे कोट्यवधी रुपये नुकसान झाले. सहा महिने झाले अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर एक दमडीही जमा झाली नाही. सव्वाशे ते दीडशे शेतकऱ्यांची प्रपंच उध्वसत झालेले आहेत. शेतातील काळी माती सुद्धा वाहून गेली आहे.
तसेच विहिरीमध्ये माती जाऊन त्या बुजल्या आहेत. केबल, मोटारी, ठिबक अक्षरश: वाहून गेले आहेत. त्यामुळे शेतकरी भयानक आर्थिक संकटात आहे. आष्टी उपासाच्या टप्पा क्र 2 वरील सारोळे खवणी पोखरापुर येथील रखडत पडलेल्या कामाला त्वरित सुरुवात करुन पाटकुलच्या बाजूच्या सारोळे, खवणी, पोखरापुरमधील उंचावरील राहिलेल्या शेतकऱ्यांना त्वरित पाण्याची व्यवस्था करावी व पाटकुलच्या पुढील टाकळीपर्यंतच्या राहिलेल्या कामाला त्वरित सुरुवात करावी या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
लोकप्रतिनिधींनी एक शब्दही काढला नाही
दरम्यान, घडलेल्या या घटनेच्या दोन-चार दिवसात दोन-तीन आमदार, खासदार सुद्धा येऊन भेटून गेले. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देतो, असे आश्वासन दिले. मात्र, दुर्दैवाची बाब अशी आहे की, एक रुपयाही जमा केलेला नाही आणि अधिवेशनात एक शब्दही काढला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.