मुंबई : शरद पवार यांनी बारामतीचा उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा करताच उद्धव ठाकरे यांनी मुंबई उत्तर-पश्चिम (वायव्य) लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर लोकसभेचा उमेदवार असल्याची घोषणा केली आहे. जुहू येथील कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी ही घोषणा केली.
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला किती मतदारसंघ मिळणार याबाबत अजूनही कोणती अधिकृत घोषणा झालेली नाही. विशेष म्हणजे जागा वाटपादरम्यान काँग्रेसकडून या मतदारसंघावर दावा करण्यात आला होता, अशीही चर्चा आहे. अशातच मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार असल्याची चर्चा सुरु असतानाच, स्वतः उद्धव ठाकरेंनी या मतदारसंघातील आपला उमेदवार घोषित केला आहे. ‘अमोल कीर्तिकर आपला लोकसभेचा उमेदवार आहे. त्यांना जिंकून द्यायचे आहे,’ असे उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आवाहन केले आहे.
मुंबई उत्तर-पश्चिम (वायव्य) या मतदारसंघाचा राजकीय इतिहास पाहिल्यास या मतदारसंघात शिवसेना-भाजपचे वर्चस्व पाहायला मिळते. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षाचे आमदार या लोकसभा मतदारसंघात आहेत. २००९ मध्ये या लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार गुरुदास कामत यांनी शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांचा ३८,३८७ मतांनी पराभव केला होता. २०१४ मध्ये मोदी लाटेत गजानन कीर्तिकर यांचा विजय झाला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा कीर्तिकर यांनी बाजी मारली आणि आपल्या मताधिक्क्यात देखील मोठी वाढ केली. दरम्यान, शिवसेनेत दोन गट झाले. मात्र, कीर्तिकर उद्धव ठाकरेंच्या गटात राहिले आणि त्यांना पुन्हा एकदा ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली आहे.