पुणे : महाराष्ट्रात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे सिस्टीमच्या वापरावर बंदी घालण्याबाबत पुण्यानंतर आता विविध जिल्ह्यांमध्ये चर्चा सुरू असून या विषयावरून राजकीय वातावरण तापले आहे. याच संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे .

पुण्यात डीजेला विरोध दर्शवणारे कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी गृहखात्याच्या कारभारावर बोट ठेवले. प्रश्न मांडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्री आणि गृहखात्याने सर्व गणेशोत्सव मंडळे, पोलीस आयुक्त तसेच विद्यानंद बापट व संतोष पंडित यांच्यासारख्या घटकांशी थेट चर्चा करून मार्ग काढावा, असा सल्ला त्यांनी दिला.

उत्सवांमध्ये गोंगाट नसून सणांचे पावित्र्य राखणे गरजेचे असल्याचे मत ठाकरेंनी व्यक्त केले. ढोल-ताशांसारखी पारंपरिक वाद्ये उपलब्ध असताना डीजेची खरोखरच गरज आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लोकमान्य टिळकांनी सामाजिक एकतेसाठी सणांची चळवळ उभी केली, मात्र सध्याच्या उत्सवांचे रूपांतर केवळ गोंगाटात होऊ नये, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ठाकरेंनी जाहीर पाठिंबा दर्शवला. स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांवरून त्यांनी सत्ताधारी आमदारांवर थेट निशाणा साधला. जे आमदार स्वतः पक्ष सोडून फुटले, त्यांना विद्यार्थ्यांच्या पेपरफुटीचे दु:ख आणि महत्त्व काय समजणार, अशी टीका त्यांनी केली. सरकार केवळ आमदार व खासदार फोडण्याच्या राजकारणात व्यस्त असून विद्यार्थ्यांच्या भविष्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.







