उरुळी कांचन, ता. 09 : गुणवत्तेचा आणि उपक्रमशीलतेचा अनोखा आदर्श निर्माण करणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अष्टापूर (ता. हवेली) या शाळेने पुन्हा एकदा आपल्या यशाची मोहर उमटवली आहे. पुणे जिल्हा परिषदेचा अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘अध्यक्ष चषक पुरस्कार’ मिळवून अष्टापूर शाळेने संपूर्ण पुणे जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे.

पूर्व हवेलीतील सर्वाधिक गुणवत्तापूर्ण व उपक्रमशील शाळा म्हणून नावारूपाला आलेल्या या शाळेच्या यशामुळे संपूर्ण हवेली तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय समितीकडून शाळेचे अत्यंत कडक आणि पारदर्शक मूल्यांकन करण्यात आले होते.

पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय समितीकडून शाळेचे अत्यंत कडक आणि पारदर्शक मूल्यांकन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने शैक्षणिक गुणवत्ता व डिजिटल क्लासरूम, परसबाग व हर्बल गार्डन, शाळेची स्वच्छता व सहशालेय उपक्रम, परिसर स्वच्छता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवले जाणारे विविध उपक्रम, लोकसहभाग व शाळा व्यवस्थापन: शाळा व्यवस्थापन समितीचे सक्रिय सहकार्य आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागातून झालेली विकासकामे याची नोंद घेण्यात येते.

‘SQAAF’ मध्ये तालुक्यात एकमेव
अष्टापूर शाळेने यापूर्वीही विविध स्पर्धांमध्ये आपल्या यशाचा झेंडा फडकवला आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सन 2024 -25 आणि 2025 /26 या दोन्ही वर्षी हवेली तालुक्यात सलग दुसऱ्यांदा द्वितीय क्रमांक पटकावला. शैक्षणिक गुणवत्ता मानकांमध्ये (SQAAF – 2024 -25) संपूर्ण हवेली तालुक्यातील ही एकमेव शाळा ठरली आहे. याशिवाय यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा स्पर्धा, जिल्हा परिषदेची ‘किल्ला स्पर्धा’ आणि ‘परसबाग स्पर्धेत’ही शाळेने नामांकने मिळवली आहेत.
दरम्यान, हवेली तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी हेमंतकुमार खाडे यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळेच शाळेला हा ऐतिहासिक पुरस्कार मिळवता आला, अशी कृतज्ञता शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी व्यक्त केली आहे. शाळेच्या या उत्तुंग यशाबद्दल पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी ललिता दहितुले मॅडम आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी अष्टापूर शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी आणि अष्टापूर ग्रामस्थांचे विशेष अभिनंदन केले आहे.







