बीड : बीडमधील विकास घुले हत्या प्रकरणावरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या आरोपानंतर छत्रपती संभाजीनगर विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या पथकाने बीड जिल्हा कारागृहात अचानक सात तासांची कसून झडती घेतली.

विशेष म्हणजे, या चौकशीदरम्यान कारागृहातील स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना बाजूला ठेवून डीआयजी देसाई यांनी स्वतः बराकमध्ये जाऊन कैद्यांची चौकशी केली. कारागृहात मिळणारी व्हीआयपी ट्रीटमेंट आणि बेकायदेशीर फोन कॉलच्या आरोपांबाबत त्यांनी थेट माहिती गोळा केली आहे.ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

खासदार सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्मिक कराडने सुग्रीव कराडला फोन करून त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मृतदेह पोलीस ठाण्यात ठेवणे आणि आंदोलन करणे अशा मार्गाने फसवण्याचा हा कट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.वाल्मिक कराड तुरुंगातून त्यांच्या मुलाला या प्रकरणात अडकवण्याचा कट रचत असल्याचा दावा त्यांनी केला. या पत्रकार परिषदेत त्यांनी वाल्मिक कराड आणि सुग्रीव कराड यांच्यातील फोनवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप ऐकवली,

बीड जिल्हा कारागृह गेल्या वर्षभरापासून सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच ठिकाणी बंदिस्त असल्याने हे कारागृह अतिसंवेदनशील मानले जाते. यापूर्वी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही कैद्यांना मिळणाऱ्या व्हीआयपी सुविधांबाबत तक्रार केली होती.
नुकतीच या कारागृहातील दोन कर्मचाऱ्यांवर गैरप्रकाराप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. आता डीआयजींच्या या विशेष चौकशीनंतर आणखी काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. दुसरीकडे, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.







