लोणी काळभोर: लोणी काळभोर (ता. हवेली) येथील महावीर निवासी मतिमंद विद्यालयाचे दोन विद्यार्थी राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून चमकले आहेत. विद्यालयाचा विद्यार्थी केतन श्रीकांत जगताप याने लांब उडी स्पर्धेत तर विद्यार्थिनी भक्ती यशवंत चौधरी हिने गोळा फेक द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. विद्यालयाला एकाच वर्षी दुहेरी यश मिळाल्याने विद्यालयाचे व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे क्रिया संचालनालय व स्व. प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथे दिव्यांग मुला-मुलींच्या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत राज्यभरातील शेकडो स्पर्धेक सहभागी झाली होते. या स्पर्धेत महावीर निवासी मतिमंद विद्यालयाच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेतील 13 ते 16 वर्ष वयोगटातील लांब उडी स्पर्धेत केतन जगताप यांने सहभाग घेतला होता. केतनला सुवर्ण पदकाने थोडक्यात हुलकावणी दिली व त्याला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. तर 13 ते 16 या वयोगटातील गोळा फेक स्पर्धेत भक्ती चौधरी हिने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. विजेत्या खेळाडूंना क्रिडा शिक्षक कमलाकर ढवळे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले.
दरम्यान, दोन्ही विजेत्या खेळाडूंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यशस्वी खेळाडूंचे शाळेच्या वतीने सत्कार करून अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तर विजेत्या स्पर्धेकांवर लोणी काळभोर सह परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.