उरुळी कांचन, (पुणे) : पूर्व हवेलीतील भुरट्या चोरट्यांनी आपला मोर्चा आता चक्क स्मशानभूमीकडे वळवला आहे. चिरीमिरी व व्यसनासाठी शवदाहिनीतील लोखंडी जाळी विकण्यापर्यंत या चोरट्यांनी मजल गेली आहे. त्यामुळे पूर्व हवेलीतील स्मशानभूमीतील शवदाहीनी भुरट्या चोरट्यांच्या रडारवर आल्या आहेत.
मनुष्य जन्मातील शेवटचा प्रवास व विधी हा स्मशानभूमीच्या आवारात केला जातो. हिंदू धर्माच्या परंपरेनुसार या विधीला अनन्यसाधारण महत्व असल्याने स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, शासनाचा निधी खर्च करून स्मशानभूमीची देखभाल दुरुस्ती व सुशोभीकरण करीत असते. यामुळे काही स्मशानभूमीचा परिसर अक्षरशः नंदनवन म्हणून ओळखला जातो. मात्र, भुरट्या चोरट्यांची वक्रदृष्टी चक्क स्मशानभूमीतील लोखंडी शवदाहिनीवर पडल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. असाच काहीसा प्रकार उरुळी कांचनपासून जवळ असलेल्या टिळेकरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत आढळून आला आहे. या स्मशानभूमीतील लोखंडी शवदाहिनी कापून घेऊन जाताना शनिवारी (ता. ०३) दोघेजण आढळून आले. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात ग्रामस्थांनी तक्रार दिली आहे.
याबाबत ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, टिळेकरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील ओढ्याच्या शेजारी गावची स्मशानभूमी आहे. शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास स्मशानभूमी परिसरात दोघेजण लोखंडी वस्तू घेऊन जाताना काही नागरिकांना आढळले होते. त्या वस्तूंची नागरिकांनी पाहणी केली असता स्मशानभूमीतील लोखंडी शवदाहिनी असल्याचे निदर्शनास आले. ग्रामस्थांनी तात्काळ ही घटना उरुळी कांचन पोलिसांना कळवली. उरुळी कांचन पोलिसांनी सदर ठिकाणी भेट दिली असून पुढील कारवाई सुरु केली आहे.
दरम्यान या स्मशानभूमीतील लोखंडी शवदाहिनी मागील चार महिन्यांपूर्वी चोरीला गेली होती. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात जबाब देण्यात आला होता. यावर उरुळी कांचन पोलीस काय कारवाई करणार याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.