Pune News : आंबेगाव : राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा समावेश ओबीसीत करण्याची मागणी केली जात आहे. सरकारतर्फे शिंदे समिती सध्या जुने संदर्भ तपासण्याचे काम युद्धपातळीवर करत आहे. मराठा आणि कुणबी एकच असल्याचे अनेक पुरावे सध्या शिंदे समितीला मिळाले आहेत. त्याचवेळी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील महाळूंगे येथे सख्ख्या दिवंगत भावांच्या शाळेच्या दाखल्यांवर जातीच्या वेगवेगळ्या नोंदी आढळल्या आहेत. एका भावाच्या दाखल्यावर कुणबी तर दुसऱ्याच्या दाखल्यावर मराठा अशी नोंद केलेली आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबातील व्यक्तींच्या वेगवेगळ्या जाती समोर आल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण पेटलेले आहे. त्यानंतर ज्यांच्याकडे नोंदणीचे पुरावे असतील त्यांना राज्य सरकारकडून कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे. परंतु मराठा आणि कुणबींमध्ये देखील अनेक गोंधळ असल्याचे उघड झाले आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात हा प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील महाळुंगे गावात दोन सख्ख्या भावांच्या दाखल्यावर वेगवेगळ्या जाती नोंदवण्यात आल्या आहेत. एकावर कुणबी आणि आणि एकावर हिंदू मराठा अशी नोंद करण्यात आली आहे. जना कृष्णाजी आंबटकर यांच्या दाखल्यावर कुणबी तर त्यांचा भाऊ सुदाम कृष्णाजी आंबटकर यांच्या दाखल्यावर हिंदू मराठा अशी नोंद केली आहे. त्यातच आता सोशल मीडियावर दाखल्यांचे फोटो व्हायरल झाल्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे.
दरम्यान, आंबेगाव तालुक्यातील एका गावातच ११२० नोंदी आढळल्या आहेत. शाळेकडून सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. तसे पत्रही सादर केले गेले आहे. तालुक्यातील अनेक गावांच्या नोंदी अजून तपासल्या गेल्या नाहीत. भावाभावांच्या दाखल्यावर वेगवेगळ्या नोंदी असल्याचे अनेक प्रकार राज्यात ठिकठिकाणी उघड होण्याची शक्यता देखील या पार्श्वभूमीवर वर्तवण्यात येत आहे. काहींच्या नोंदी कुणबी केल्या गेल्या आहे. त्यानंतर त्यातील काही नोंदी मराठा म्हणून लावल्या गेल्या आहेत. कुणबी प्रमाणपत्राचे वाटप झाल्यानंतर अनेक ठिकाणी तरुणांनी ते जाळून देखील टाकले आहे. मात्र, आंबेगाव तालुक्यातील दोन भावंडांची प्रमाणपत्र व्हायरल झाल्याने पुन्हा शिंदे समितीने तयार केलेल्या अहवालावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
राज्यातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी दाखला द्यावा, त्यासाठी मराठवाड्यातील कुणबी दाखल्यांच्या पुराव्याचा आधार घ्यावा, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. अर्धवट प्रमाणपत्र घेणार नाही आणि वाटू देणार नाही. सरकारने विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा करावी. शिंदे समितीचा प्रथम अहवाल तयार करून त्याला राज्याचा दर्जा देऊन सरसरट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावीत अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.