पुणे : महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. राज्यात बंदी असलेल्या ‘विमल पान मसाला/इलायची’ या उत्पादनाची जाहिरात आणि प्रचार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने तिन्ही कलाकारांना या जाहिरातींमधील आपला सहभाग त्वरित थांबवण्यास सांगण्यात आले आहे.तसेच त्यांच्या सर्व अधिकृत सोशल मीडिया खात्यांवरून आणि वेबसाइट्सवरून विमल पान मसाल्याशी संबंधित सर्व जाहिराती व व्हिडिओ तात्काळ काढून टाकण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

दरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का केली जाऊ नये, याचे सविस्तर लेखी उत्तर देण्यासाठी प्रशासनाने 15 दिवसांची मुदत दिली आहे.वर्ष 2024 मध्ये विमल कंपनीच्या या पान मसाल्याच्या जाहिरातीसाठी हे तीनही दिग्गज अभिनेते पहिल्यांदाच एकत्र आले होते. या जाहिरातीचे प्रसारण सुरु झाल्यानंतर त्यावर नागरिकांकडून आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. महाराष्ट्रात पान मसाला आणि तत्सम पदार्थांच्या विक्रीवर तसंच प्रचारावर बंदी असल्याने प्रशासनाने आता यावर कठोर भूमिका घेतली आहे.

आरोग्यास घातक असणाऱ्या आणि राज्यात बंदी घालण्यात आलेल्या पदार्थांचा प्रचार प्रसिद्ध व्यक्तींनी करणे अयोग्य असल्याचे सांगत एफडीएने ही नोटीस बजावली आहे. दिलेल्या 15 दिवसांच्या मुदतीत हे अभिनेते काय स्पष्टीकरण देतात, यावर पुढील कायदेशीर कारवाई अवलंबून असणार आहे.







