पुणे : आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या शिरदाळे गावात भटक्या कुत्र्यांची दहशत अधिक वाढली आहे. नुकत्याच घडलेल्या एका भीषण घटनेत 8 ते 10 कुत्र्यांच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात एका चिमुकल्याचा जीव थोडक्यात वाचला. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आईने दाखवलेल्या विलक्षण धैर्यामुळे बालकाला इजा झाली नाही, परंतु कुत्र्यांच्या प्राणघातक हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, रुपाली उत्तम रणपिसे या सकाळी आपल्या लहान मुलासह, शिवमला सोबत घेऊन गोठ्यात दूध काढण्यासाठी जात होत्या. रस्त्यात आधीच ठाण मांडून बसलेल्या कुत्र्यांच्या टोळक्याने अचानक बालकाच्या दिशेने धाव घेतली. मुलावर ओढवलेला धोका ओळखून रुपाली यांनी क्षणाचाही विचार न करता शिवमला तातडीने उचलून बाजूला केले. त्यामुळे लहानगा शिवम सुरक्षित राहिला.

परंतु, संतप्त कुत्र्यांनी मोर्चा रुपाली यांच्याकडे वळवला आणि त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात कुत्र्यांनी त्यांच्या शरीरावर ठिकठिकाणी गंभीर चावे घेतले. रुपाली यांच्या आक्रोशाचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक कांताराम तांबे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कुत्र्यांना पळवून लावले. यानंतर जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले.

शिरदाळे परिसरात सध्या भटकी कुत्रे आणि त्यांचा उपद्रव खूप वाढला आहे. “गावात अशी दुर्घटना पुन्हा घडल्यास मोठ्या जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा,” अशी आक्रमक भूमिका जखमी महिलेचे पती उत्तम रणपिसे व स्थानिक ग्रामस्थांनी घेतली आहे.
तसेच, गावात मोकाट फिरणाऱ्या पाळीव कुत्र्यांच्या मालकांनीही आपल्या प्राण्यांना सुरक्षितपणे बांधून ठेवावे, असे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.







