लोणी काळभोर : लोणी काळभोर पोलिसांनी थेऊर आणि माळीमळा परिसरात कारवाई करत दोन ठिकाणी सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू विक्रीवर छापा टाकला. या कारवाईत एका महिलेसह दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, दारू सेवनासाठी आलेल्या दोन जणांवरही कारवाई करण्यात आली.

थेऊर पोलीस चौकीच्या हद्दीतील कुंजीरवस्ती येथे 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी पोलिसांनी छापा टाकला. यावेळी तुळसाबाई दगडू राखपसरे (वय 60 ) ही महिला विनापरवाना गावठी हातभट्टी दारू विक्री करताना आढळून आली. तिच्याकडून सुमारे अडीज लिटर दारू जप्त करण्यात आली.

दरम्यान, लोणी काळभोर (ता. हवेली) माळीमळा परिसरात चिंतामणी मंगल कार्यालयासमोरील पत्र्याच्या शेडजवळही पोलिसांनी कारवाई केली. येथे संजय दादू राखपसरे (वय 55 ) हा गावठी दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून 2 लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. दारू सेवनासाठी आलेले रमेश जाधव (55 ) आणि पांडुरंग दुनघव (75) यांनाही ताब्यात घेण्यात आले.

या दोन्ही कारवायांमध्ये जप्त दारूचा नमुना तपासणीसाठी सुरक्षित ठेवण्यात आला असून उर्वरित दारू जागेवरच नष्ट करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी चौघांवर भारतीय न्याय संहिता कलम 123, 274, 275 तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.







