पुणे : नालासोपारा पूर्व येथील निळकंठेश्वर इमारतीमध्ये वाढदिवसाच्या पार्टीनंतर 11 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची गंभीर घटना शनिवारी रात्री घडली. यामध्ये 7 लहान मुलांसह 4 महिलांचा समावेश आहे.

इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणीच्या वाढदिवसानिमित्त घरी लहान मुले आणि नातेवाईक जमले होते. सायंकाळी केक कापल्यानंतर तो उपस्थितांना खाण्यासाठी देण्यात आला. केक खाल्ल्यानंतर काही वेळातच उपस्थितांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला.त्रास वाढल्याने बाधितांना तातडीने टाकीपाडा भागातील विजयलक्ष्मी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व 11 जणांवर वेळेवर वैद्यकीय उपचार करण्यात आल्यामुळे सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

केक खाताना त्यामध्ये मृत पाल आढळल्याचा दावा काही मुलांनी केला आहे. मात्र, या दाव्याला अद्याप प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. विषबाधा नक्की कशामुळे झाली, याचा शोध घेण्यासाठी केकचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाण्याची शक्यता आहे.

तपासणीचा अहवाल आल्यानंतरच या घटनेमागचे खरे कारण स्पष्ट होईल. या प्रकारामुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात असून अन्नपदार्थांच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.







