उरुळी कांचन : येथील अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन संचलित महादेव कांचन कॉलेज ऑफ फार्मसी, डॉ. अस्मिता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि डॉ. अस्मिता इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल, उरुळी कांचन यांच्या संयुक्त विद्यमाने 80 वा स्वातंत्र्य दिन दिमाखदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

शनिवारी (ता.15) सकाळी संस्थेच्या प्रांगणात पंतप्रधान कार्यालय सल्लागार समितीचे सचिव कर्नल नवीन झा आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे सचिव डॉ. अजिंक्य महादेव कांचन (यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी कमांडो प्रशिक्षण, लाठीकाठी, मल्लखांब, रायफल शूटिंग, आर्चरी (धनुर्विद्या) आणि कराटे यांसारखी आव्हानात्मक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यासोबतच देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिसर भक्तीमय आणि स्फूर्तिमय करून सोडला.

प्रमुख पाहुणे कर्नल नवीन झा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. त्यांनी आपल्या लष्करी सेवेतील अनुभव सांगून विद्यार्थ्यांना देशसेवेसाठी प्रेरित केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. अजिंक्य कांचन यांनी शैक्षणिक संकुलाच्या भव्य विस्ताराची घोषणा केली. शैक्षणिक वर्ष 226-27 पासून MBA, MCA, MCS, BMMMS तसेच BHMS आणि इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. “येत्या काळात उरुळी कांचन येथील अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन हे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये एक प्रमुख ‘सायन्स हब’ म्हणून ओळखले जाईल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यकारी संचालक डॉ. आप्पासाहेब जगदाळे यांनी प्रास्ताविकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातील हक्क आणि कर्तव्यांची जाणीव करून दिली. या सोहळ्यास उरुळी कांचनच्या माजी सरपंच ऋतुजा कांचन, महात्मा गांधी विद्यालयाच्या मानद पर्यवेक्षिका रत्नप्रभादेवी भोर, प्रतिभा कांचन, डॉ. अस्मिता बहिरट कांचन, वाल्मीक तुपे, अजित कुमार शुक्ला आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्या कांचन चव्हाण, यांनी केले तर फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. नितीन गवई, विद्यालयाच्या प्राचार्या रोहिणी जगताप, सीबीएसईच्या प्राचार्या योगिनी धारवाडकर, नानासाहेब परभणे, रेवती पकाले, ठाकूर मॅडम व श्वेता लोळे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मार्गदर्शन केले. नानासाहेब परभणे यांनी उपस्थितांचे आभार मानले







