पुणे: पुणे दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाची पाहणी केली. यावेळी मुख्याध्यापकांच्या कार्यालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकारावरून वाद निर्माण झाला. अखेर प्राचार्यांच्या तक्रारीनंतर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात अमित ठाकरे यांच्यासह २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाविद्यालयातील कार्यालयात नरेंद्र मोदी यांचा फोटो छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांसोबत लावण्यात आला होता. हा फोटो त्या रांगेत का लावण्यात आला, अशी विचारणा अमित ठाकरे यांनी केली. सरकारी महाविद्यालय असल्याने प्रोटोकॉलनुसार पंतप्रधानांचा फोटो असावा, मात्र तो शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांच्या बाजूला लावण्यास त्यांनी आक्षेप घेतला.

“मोदी छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे झालेत का? मोदी बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मोठे झालेत का?” असा सवाल अमित ठाकरे यांनी उपस्थित केला. प्रोटोकॉलनुसार मोदींचा फोटो लावायचा असल्यास कार्यालयातील दुसऱ्या ठिकाणी लावावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, या घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. महाविद्यालय प्रशासनाने मोदींचा फोटो पुन्हा लावला असून, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही महाविद्यालयात भेट दिली.
या संपूर्ण वादाला विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील निकृष्ट जेवणाच्या तक्रारीचीही पार्श्वभूमी आहे. पाहणीदरम्यान विद्यार्थ्यांनी जेवणात अळी आढळल्याचे फोटो दाखवल्यानंतर अमित ठाकरे यांनी कँटीनची पाहणी केली. सडलेले कांदे आढळल्यानंतर त्यांनी ते प्राचार्यांच्या टेबलवर ठेवून प्रशासनाला जाब विचारला.
मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना अमित ठाकरे यांनी, हा गुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी असेल तर आपल्याला त्याचा अभिमान असल्याचे म्हटले आहे.






