हनुमंत चिकणे
उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन जवळील शिंदवणे घाटातून चाकण याठिकाणी कोंबडी खाद्य घेऊन निघालेला ट्रक उलटून झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची मैत्रीण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. २६) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
रामेश्वर लक्ष्मण शिंदे (वय २१, रा. शेलू, ता. परतूर, जि. परभणी) असे मृत्यू झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. पायल शेख (वय २३, रा. मिरज, सांगली) असे अपघातात जखमी झालेल्या त्याच्या मैत्रिणीचे नाव आहे.
याबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालक रामेश्वर शिंदे हे फलटण येथून चाकण याठिकाणी कोंबडी खाद्य घेऊन निघाले होते. या ट्रकमध्ये त्याची मैत्रीण पायल ही देखील त्याच्यासोबत होती. रविवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शिंदवणे घाट याठिकाणी आले असता, शिंदे यांना घाटात असलेल्या वळणाचा अंदाज आला नाही. त्यांचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रक रस्त्यावर उलटला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कदम रुग्णवाहिकेचे वैभव कदम, कस्तुरी प्रतिष्ठानची रुग्णवाहिका, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रमेश गायकवाड, बाळासाहेब पांढरे, आदींनी जखमींना मदत केली. दरम्यान, ट्रकचालक शिंदे व पायल यांना उरुळी कांचन येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारापूर्वीच शिंदे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
तसेच शिंदे यांची मैत्रीण पायल शेख हिच्यावर उरुळी कांचन येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुढील उपचारासाठी त्यांना मिरज याठिकाणी पाठविण्यात आले आहे. या घटनेबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अपघाताच्या ठिकाणावरील वळणाचा टप्पा कमी करण्याची मागणी
शिंदवणे घाटात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अपघाताच्या ठिकाणावरील वळणाचा टप्पा कमी करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली. जड वाहने वळताना वाहनचालकाला अंदाज येत नसल्याने हे अपघात होत आहेत. त्यामुळे सासवडकडून येणारा वळणाचा टप्पा वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्याने हे अपघात होत आहेत. हा टप्पा काढण्याची मागणी नागरिक करत आहेत.