माढा : थोर महापुरुषांचे कार्य व विचार आजच्या पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहेत. त्यामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्यासह अनेक महापुरुषांच्या कार्याचा व विचारांचा वारसा आजच्या पिढीने जपणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन विठ्ठलवाडी वाचनालयाचे माजी अध्यक्ष तथा आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी व्यक्त केले.
विठ्ठलवाडी (ता. माढा) येथील श्री विठ्ठल सार्वजनिक वाचनालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजेंद्र गुंड बोलत होते. यावेळी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन प्रगतशील शेतकरी पांडुरंग खांडेकर व शिवाजी कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र भांगे होते.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य भिमराव गुंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रामचंद्र भांगे, सौदागर गव्हाणे, सचिव नेताजी उबाळे, सतीश गुंड, कैलास सस्ते, नामदेव भुसारे, धनाजी शेंडगे, हनुमंत नागटिळक, ग्रंथपाल अमोल जाधव, रवींद्र शैंडगे, धनाजी भांगे, शिवाजी खरात यांच्यासह ग्रामस्थ व सभासद उपस्थित होते.
यावेळी वाचनालयाचे सचिव नेताजी उबाळे म्हणाले की, प्रत्येकाने नेहमी सत्याची पाठराखण करुन वाईट विचारांचे लोक तसेच विविध प्रकारच्या वाईट व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी सर्वांनी दर्जेदार पुस्तके व साहित्याचे वाचन करण्याचे आवाहन केले.