पुणे : गणरायाच्या आगमनानंतर सुख समृध्दी व सौभाग्याचे प्रतिक असलेल्या ज्येष्ठा गौरींचे अर्थात महालक्ष्मीचे शनिवारी (ता. ३) सोनपावलांनी आगमन झाले आहे. गौरीच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला गौरीचे पूजन व महानैवेद्य अर्पण करण्यात आला आहे.
आज गौरी पूजनाचा दिवस आहे. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन केले जाते. गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला आहे. तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. गौरीपूजनला काही ठिकाणी महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते, म्हणूनच याला ज्येष्ठागौरी असेही म्हटले जाते. आजही परंपरेनुसार हा उत्सव साजरा केला जातो. काही ठिकाणी धान्यावर बसलेल्या तर काहींकडे उभ्या महालक्ष्मींना दागिने तसेच मुखवटे घालून सजावट केली आहे. तर काहींनी विविध शृंगार करीत महालक्ष्मींना सजविले आहे.
दरम्यान, कुटुंबात लक्ष्मीचा वास राहून सर्व सदस्यांना उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी घरात नांदावी, यासाठी गौरी पूजन अर्चना करण्यात येते. ज्येष्ठा नक्षत्रावर केवडा, पडवळ, कमळाचे फुल तसेच सोळा प्रकारची पत्री विविध पुष्पांनी महालक्ष्मींचे पूजन करण्यात येते. तसेच गौरींना पुरणपोळी, लाडू, करंजी, अनारसे, सोळा प्रकारच्या भाज्या यासह अन्य पंचपक्वानांचा महानैवेद्य अर्पण करण्यात येतो.
नेहमीप्रमाणे महालक्ष्मीची पूजा करून नैवेद्य दाखवून तो आपण प्रसाद म्हणून घ्यायचा असतो. कोकणात अनेक ठिकाणी गौराईला तिखटाचा नैवेद्य म्हणजेच मांसाहाराचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. यावेळी गौराईसाठी कोंबडी-वडे असा नैवेद्य केला जातो. सोमवारी ५ सप्टेंबरला भाद्रपद शुक्ल पक्ष नवमीला बलवान मूळ नक्षत्रावर गौरीला अक्षदा वाहून विसर्जन करावे.