सुरेश घाडगे
परंडा : साकत (खु) ते परंडा या रस्त्याच्या दुरूस्ती अभावी रस्त्यांची अक्षरशा दुरवस्था झाली आहे. खड्डे, चिखल आणि त्यात साचलेले पाणी यामुळे वाहन चालक व नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे. त्यामुळे याकडे लक्ष वेधण्यासाठी व या रस्त्याचे काम करण्यासाठी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वातंत्र्य दिनी सोमवारी (ता. १५) उपोषण करणार असल्याचे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे.
साकत (खु) ते परंडा हा जाणाऱ्या वाहनांसाठी व नागरिकांसाठी प्रमुख वर्दळीचा रस्ता आहे. रस्ते दुरुस्तीला प्राधान्य देण्याऐवजी बघ्याची भूमिका घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्यांची अवस्था खड्डेमय झाली आहे. त्यामुळे या परिसरातील ग्रामीण भागातील वाडी- वस्त्याला जोडणारे रस्तेही खड्डेमय झाल्याने वाहनधारक व प्रवाशांची मात्र कसरत होताना दिसून येत आहे.
नागरिक, शाळेत ये-जा करणारे विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण, वाहनचालक, प्रवाशी यांची मोठी गैरसोय होत आहे. अशी दयनीय परिस्थिती असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन -प्रशान व लोकप्रतिनिधींचे मात्र दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पावसाळ्यापूर्वीची इतर डागडुजीची कामे या वर्षी करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे पहिल्याच पावसाने हा रस्ता जागोजागी चिखलात गेला आहे. रस्त्यात जागोजागी पडलेल्या खड्ड्यात पाणी साचले आहे. पाणी साचल्याने खड्ड्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने पावसाळा सुरु होताच वाहन चालकांची व नागरिकांची तारेवरची कसरत सुरु झाली आहे.
दरम्यान, जाण्या-येण्यासाठी हा एकमेव रस्ता असल्याने या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी हा रस्ता फारच खराब झाला आहे. या रस्त्याने वाहने चालविणे अवघड झाले असून, अनेक दिवसांपासून मागणी करूनही या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.