उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हाद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून बुधवारी (ता. 08) पहाटेच्या सुमारास अज्ञात तीन चोरटे हातात शस्त्रे घेऊन फिरत असल्याचे दिसून येत आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तांबे वस्तीतील शिवतेज नगर परिसरात हे तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरीच्या घटना घडत आहेत. घरात कोणी नसल्याची संधी साधत बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे पाऊणे तीन लाखांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना आश्रम रोडवरील आय.डी.बी.आय बँकेच्या वरती घडली होती. तसेच शुक्रवारी (ता. 27 डिसेंबर) एका बड्या राजकीय नेत्याची बुलेट चोरीला गेली आहे. या दोन्ही घटनेतील चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात आले आहे. फुटेजमध्ये चोरट्यांचे चेहरे दिसत असून अद्यापहि चोरट्यांचा तपास लागलेला नाही.
उरुळी कांचन व परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ मागील एक ते दीड महिन्यांपासून सुरु आहे. दुचाकी गाड्या चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. तर सदनिकांचे कडी कोयंडे तोडून ऐवज चोरून नेण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिक अस्वस्थ झाले आहेत. या घरामध्ये चोरटे प्रवेश करतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत असून चोर पोलिसांना चकवा देत आहेत. या वारंवार घडत असलेल्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, या चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या चोरट्यांच्या हातात मोठी कटावणी दिसून येत आहे. तर सदरचे चोर हे 30 ते 35 या वयोगटातील असल्याचा अंदाज असून त्यांनी डोक्याला काळ्या रंगाचे टोप घातलेले आहेत. चोरीच्या उद्देशाने ते रस्त्यावर वावरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रित झाले आहेत. सदर प्रकरणी अद्याप उरुळी कांचन पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देण्यात आली नाही.